Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 June
2024
Time: 6.30
AM to 6.40 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जून २०२४ सकाळी ६.३० मि.
****
ठळक बातम्या
· दहाव्या आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
· नीट २०२४ प्रकरणी चौकशीसाठी
केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन
· राज्यात पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ
आणि
· टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेच्या सुपर एटमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
दहावा
आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी यानिमित्त योगाभ्यास
तसंच सुदृढ आरोग्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत:साठी
आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिवाची संकल्पना आहे.
योग
दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत होत आहे.
****
आयुष
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी, गेल्या दहा वर्षात योगाभ्यासाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी
केंद्र सरकारनं केलेल्या
प्रयत्नांची प्रशंसा केली. योग दिनानिमित्त आकाशवाणीला
दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Byte…
सात
कोटीहून अधिक भारतीयांनी योग अंगिकारण्याचा ऑनलाईन संकल्प केल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात योगासन शिबिराचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुलात होत आहे. छत्रपती
संभाजीनगर इथले योग अभ्यासक श्रीकांत पत्की यांनी योग या संकल्पनेची व्याख्या आणि अष्टांगयोगाची
माहिती दिली.
Byte….
लातूर
इथं जिल्हा क्रीडा संकुलात, नांदेड इथं श्री गुरुग्रंथ साहिबजी भवनात तर जालना इथं
जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहिक योग आणि प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं आहे.
हिंगोली
शहरात काल योग जागरूकता फेरी काढण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा योग समिती, पतंजली योग समिती, माणिक स्मारक आर्य विद्यालयाचे
विद्यार्थी तसंच योग जागृतीसाठी काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी या फेरीत सहभाग
नोंदवला होता.
****
वैद्यकीय
प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी
करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय
परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्यासाठी या समितीकडून शिफारसी
अपेक्षित असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.
दरम्यान, नीट गैरव्यवहार प्रकरणांशी
संबंधित विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित
करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं
काल संबंधितांना नोटीस बजावली आहे. या सर्व याचिकांवरची सुनावणी येत्या ८ जुलैला होईल.
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयनं यूजीसी - नेट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहारांबाबत गुन्हा
दाखल केला आहे. शिक्षण विभागाच्या सचिवांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरोधात
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मुंबई
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या मतदारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. अर्ज का बाद झाले याची कारणं सांगण्याची मागणी, निवडणूक अधिकारी कार्यालयात केली असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
लोकसभा
निवडणुकीनंतर ईव्हीएम पडताळणीसाठी एकूण अकरा अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अहमदनगर
लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचा समावेश आहे.
वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघातल्या ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट
पावत्यांच्या मोजणीसाठी आयोगाकडे १८ लाख ८८ हजार रुपये शुल्क जमा केल्याची माहिती विखे
पाटील यांनी दिली.
****
१८
व्या लोकसभेचं अधिवेशन सुरु करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार
भर्तृहरी महताब यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय
कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. येत्या सोमवारपासून
संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे.
****
दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयानं
जामीन मंजूर दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे.
केजरीवाल यांना या प्रकरणी २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
****
बिहार
सरकारनं सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा
उच्च न्यायालयानं काल रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५०
टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं
होतं.
****
मराठा
आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं मत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बारामती इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. या समाजांच्या आंदोलनांमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, म्हणून केंद्र सरकारनं काळजी
घ्यावी, असंही
पवार यांनी म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत..
****
राज्यातल्या
पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी पांढऱ्या शिधापत्रिका
आधार कार्डशी संलग्न करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं काल सर्व
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातल्या लाखो पांढऱ्या शिधापत्रिकाधारक
कुटुंबांसाठी आरोग्य सुविधा मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात लाभार्थ्यांची
संख्या एक हजारांपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं
आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महामंडळाच्या
योजना ग्रामस्तरावर तसंच तालुका पातळीवर पोहचवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज
त्यांनी व्यक्त केली.
****
जालना
जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं ओबीसी आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि
नवनाथ वाघमारे यांची काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली.
दरम्यान, या
नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री इथं येणार असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
आळंदी
-पंढरपूर पालखी मार्गावरच्या प्रमुख दहा गावांमध्ये २५ जून ते १७ जुलै या काळात वारकऱ्यांच्या
जीवनावर आधारित दिठी हा मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आळंदीत पंचवीस जूनला उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या चित्रवारीला सुरुवात होणार
आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर
इथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने सुमारे साठ हजार वारकऱ्यांसह काल पंढरपुरकडे
प्रस्थान केलं.
****
नांदेड
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयात शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी विशेष स्वच्छता
मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
यांनी ही माहिती दिली. दर महिन्याच्या २५ तारखेला राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा उद्देश, स्वच्छतेच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण
करणं, पर्यावरणपूरक
साधनांचा वापर वाढवणं हा असल्याचं करनवाल यांनी सांगितलं.
****
टी
- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर एटमध्ये भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी
विजय मिळवला. काल बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने
निर्धारित षटकात १८१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं ५३, हार्दिक पंड्यानं ३२, विराट कोहलीनं २४ धावा केल्या.
प्रत्यूत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराह
आणि अर्शदीप सिंहनं प्रत्येकी तीन, तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले. सूर्यकुमार यादव प्लेयर
ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
या
स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश दरम्यान सामना सुरु आहे, तर संध्याकाळी इंग्लंड आणि
दक्षिण आफ्रिकेदरम्यान सामना होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या पुढाकारातून सुरु झालेला 'आम्हाला खेळू द्या' या अभियानाअंतर्गत आंतरराष्ट्रीय
दर्जाचे चार प्ले पार्क बनवण्यासाठी सि एस
एन फर्स्ट ने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पहिलं प्ले पार्क बनवण्यासाठीच्या करारावर
काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे पार्क ज्योती नगर परिसरात उभारण्यात
येणार आहे.
****
येत्या
दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव इंथ मेघगर्जनेसह
हलक्या स्वरुपाचा तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार वारा, मेघगर्जनेसह मध्यम पावसाची
शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात काल दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह
पावसाच्या सरी कोसळल्या.
****
No comments:
Post a Comment