Sunday, 21 July 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

 

ठळक बातम्या 

·      जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      नीट-यूजी परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी जाहीर, पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून आणखी तीन जणांना अटक

·      मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात

आणि

·      विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताचा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल, असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जागतिक वारसा समितीवर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे, अजिंठा वेरुळच्या लेण्यांसह देशातल्या एकूण ४२ वारसा स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे.

****

राष्ट्रीय परीक्षा परिषद- एनटीएने, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी काल आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. सर्वोच्च न्यायालयानं एनटीएला दिलेल्या निर्देशानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला.

दरम्यान, नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सी.बी.आय.नं आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. यात पेपरफुटीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार शशिकांत पासवानसह राजस्थानमधल्या भरतपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या  कुमार मंगलम आणि दीपेंद्र शर्मा या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, येत्या मंगळवारी २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे.

****

मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलातांना, धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, तसंच नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काल धारावी पुनर्वसन मुद्यावरून सरकारवर टीका केली. या प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली असून, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली असल्याचं, पटोले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक उभारता, छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून नकली वाघनखं आणल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

****

महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असून, आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह यापुढे पक्षासाठी सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील, मात्र हा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय फक्त राज्यापुरता लागू असून, लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी देखील हाच निर्णय लागू करायला हवा, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, आदी मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांवरही त्यांनी टीका केली. सध्या शेत कामांचे दिवस असल्यानं कुणीही आंतरवालीकडे येऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, सरकारने परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याच्या निर्णयाचं जरांगे यांनी स्वागत केलं आहे.

****

गुरूपौर्णिमेचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. आध्यात्मिक तसंच कला क्षेत्रातल्या गुरुशिष्य परंपरेत या दिवसाचं मोठं महत्त्व मानलं जातं. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाला काल प्रारंभ झाला. काल उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साईसमाधी मंदिर काल रात्रभर दर्शनासाठी उघडं ठेवण्यात आलं होतं.

****

विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातले अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. नागभीड तालुक्यात बोथली इथले दोन जण नाल्याच्या पुरात वाहून गेले, यापैकी एकाचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्याचा तपास सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, २७ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यात पोटेगाव नजीकच्या कुंभी नाल्याच्या काठावर अडकलेल्या काही शेतकऱ्यांची, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बोटीच्या सहाय्याने सुटका केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भंडारा जिल्ह्यात काल सकाळी २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. दरम्यान, नागपूर रायपूर महामार्गावर दरड कोसळल्याने तासभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २७ दरवाजे उघडण्यात आले असून, तीन हजार ३३ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चंद्रपूर इथं गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अकोला इथं पहाटेनंतर रिमझीम पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणीपातळीही वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मुंबईतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुक खोळंबली होती. अंधेरी भुयारी मार्ग पाणी साचल्यानं बंद ठेवण्यात आला. आज मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, येत्या १२ तासांत जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

****

विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यात २१ ते २३ जुलै दरम्यान विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान केंद्राने वर्तवली आहे.

****

परभणी जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतपिकांची चांगली वाढ झाली आहे. रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

श्रीलंकेत आयोजित महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना संयुक्त अरब अमिरात-यु...सोबत होणार आहे. दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा पोलिसांनी अवैधरित्या, पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या तरुणास अटक केली आहे. मयूर भरेकर असं या तरुणाचं नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. काल तो जळगाव इथून छत्रपती संभाजीनगरकडे खाजगी वाहनाने येत असतांना, अजिंठा पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं परवा एका तरुणाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी काल चार जणांना अटक केली.

****

नांदेड जिल्ह्यात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमांतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात २६१ इंग्रजी शाळांमध्ये २ हजार ६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी ३५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात १ लाख ४३ हजार २५१ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांपैकी ५९ हजार ९९४ अर्जांना ग्रामीण भागातील तालुका समितीने मान्यता दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...