Wednesday, 17 July 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र १७ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१७ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आषाढी एकादशी आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरी होत आहे. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदीरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीस लागू दे, तसंच प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केली आहे.

****

संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते आज महापूजा करण्यात आली.

प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. ही पालखी नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.

****

मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ताजिया मिरवणूक काढली जाते. 

****

भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे, याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताचा वाढता प्रभाव, सहभाग आणि उपस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.

****

शिर्डी इथल्या साईबाबा मंदिराला सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा सीआयएफएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा पुरवण्याबाबत शिफारस करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ३० नोव्हेंबर पर्यंत याबाबतचा गोपनीय अहवाल समितीला न्यायालयात दाखल करावा लागणार आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...