Tuesday, 16 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित-मसुरीच्या प्रशासकीय अकादमीत हजर होण्याचे निर्देश

·      आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आज पंढरपूर दौऱ्यावर-प्रशासकीय यंत्रणा सज्ज

·      प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

·      जल जीवन मिशन अंतर्गत कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

आणि

·      वंचित बहुजन आघाडीची येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

****

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं आहे. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने खेडकर यांना पत्र पाठवून ही माहिती देत, महाराष्ट्र राज्य सरकारच्या या कार्यक्रमातून पदमुक्त करत, अकादमीत परत बोलावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २३ जुलै पूर्वी अकादमीत हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश खेडकर यांना देण्यात आले आहेत.

****

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातली प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, चोख पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज नजिक असलेल्या पंढरपुरातही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंदिराला विद्युत रोषनाई करण्यात आली आहे.

 

आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो एक्स्प्रेस ही रेल्वे भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.

 

पंढरपूर इथं ३४ फलाटांच्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण होत आहे. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच भव्य प्रकल्प आहे, सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून अकरा हेक्टर जागेवर या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच एक हजार यात्रेकरूंसाठी निवासस्थान देखील बांधण्यात आलं आहे.

****

दरम्यान, मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातातल्या जखमींची चौकशी केली, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. अपघातात जखमी झालेल्या ४६ प्रवाशांवर या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. आषाढी एकादशीनिमित्त ही बस डोंबिवलीहून पंढरपूरकडे जात असतांना, लोणावळ्याजवळ झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजे १५ जुलै पर्यंत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही; त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पीक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन कृषीमंत्री मुंडे यांनी केलं आहे.

****

जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती द्या तसंच या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या जलजीवन मिशन आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा त्यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एक हजार २३४ कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर २८ पाणी पुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबवण्यात येत आहेत. ही कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणं आवश्यक असल्याचंही पवार म्हणाले.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आता येत्या सहा ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला या याचिकेबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे, तर शरद पवार गटाला या उत्तरावर प्रतिवाद करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.

****

राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

****

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, विदर्भ तसंच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गक्रमण करत, आठ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेची सांगता होणार आहे.

ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससी शिष्यवृत्ती वाढ झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. यासाठी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर बैठका तसंच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

****

संगणकीय प्रणालीमुळे म्हाडाची सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली असल्याचं, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ- म्हाडाची प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांचं अभिनंदन करत, दोन महिन्यात आणखी एक सोडत काढण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर नजिक नक्षत्रवाडी परिसरात एक हजार घरांच्या नव्या प्रकल्पाचं पुढच्या दहा दिवसांत भूमिपूजन करणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.

****

राज्यात ज्या प्रकल्पग्रस्तांना कमी मोबदला मिळालेला आहे, लवकरच त्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. अर्थसंकल्पातल्या निधी वाटपासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांची कोणतीही तक्रार नाही, तसंच राज्यातल्या २८८ मतदार संघात विकासाच्या योजना पोहोचत असल्याने, जनता समाधानी असल्याचं राठोड यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. मातंग समाज आणि संबंधित बारा पोट जातीतल्या दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसंच वैद्यकिय आणि अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी बीडच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्हि. एस. सोनवणे यांनी केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्लांट फॉर मदर किंवा एक पेड मां के नाम या उपक्रमांतर्गत नांदेड वन विभागामार्फत एक लाख तीस हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने साग, बहावा, बांबू, चारोळी अशा स्थानिक प्रजातीच्या रोपांचा समावेश असल्याची माहिती नांदेड वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी दिली. या उपक्रमासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून नागरिकांना स्थानिक प्रजातीची रोपे अत्यल्प दरात पुरवली जाणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन उपवनसंरक्षक वाबळे यांनी केलं आहे.

****

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२४ या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आज गौरव करण्यात आला. कझाकस्तानमध्ये सात ते तेरा जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पटकावली, विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण पदक तर रत्नागिरीतल्या इशान पेडणेकरनं रौप्य पदक पटकावलं आहे. तर चेन्नई इथल्या श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशमधल्या यशस्वी कुमार या दोघांनीही रौप्य पदक पटकावलं आहे. यावेळी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या अधिष्ठाता प्राध्यापिका सविता लदगे उपस्थित होत्या.

****

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या फेरीत भारताच्या सुमित नागलची लढत स्वीडनच्या एलियास यमरशी होत आहे, तर पुरुष दुहेरीच्या लढतीत आज सुमित नागल आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी या जोडीचा सामना फ्रान्सच्या जोडीशी होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...