Wednesday, 10 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·   मुस्लिम महिलांनाही पतींकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      आरक्षणाच्या मुद्यावरून विधीमंडळात गदारोळ-दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

·      मराठवाड्यात भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे जिल्हा यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश

आणि

·      संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या उपक्रमाला छत्रपती संभाजीनगर इथं मनपा शाळेत प्रारंभ

****

मुस्लिम महिलांनाही पतींकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं आज घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यास विरोध करणारी एक याचिका फेटाळून लावत, ही बाब स्पष्ट केली. मुस्लिम महिला अधिनियम १९८६, हा धर्मनिरपेक्ष कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं. याशिवाय, पोटगी मिळण्याचा कायदा फक्त विवाहित महिलांसाठीच नाही तर सगळ्या महिलांसाठी लागू असल्याचंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ झाल्याने विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज तहकूब झालं. विधानसभेत या मुद्यावरून सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली. आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आश्वासनही देऊनही उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्या या कृतीमागचा बोलाविता धनी कोण, असा प्रश्न विचारत, विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन भाजपचे आशिष शेलार यांनी केलं

मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे समाजाबरोबर आपण सगळे आहोत हे दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा सेना वेगळी भूमिका घेतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

 

दरम्यान, यावेळी विरोधकांनी आणि त्याच्या उत्तरात सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, सदनाचं कामकाज सकाळच्या सत्रात चार वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केल्या आणि कोणत्याही चर्चेशिवाय गदारोळातच या मागण्या मंजूर करण्यात आल्या. याशिवाय, कर विषयक कायदे सुधारणा विधेयक, महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध विधेयक आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

 

विधान परिषदेतही सदर बैठकीला विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून गदारोळ झाला. त्यानंतर उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनमतानं दिवसभराचं कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सभागृहाचं कामकाज तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देत निषेध नोंदवला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, सरकारला आरक्षणावर समाधारकारक तोडगा काढता येत नसेल, तर पायउतार व्हावं, असा सल्ला दिला

शासनाला जे काही करायचंय ते या अधिवेशनात मांडावं. हाऊस चालू असताना अशी बैठक बाहेर घेण्याची गरज काय? सरकारबरोबर २०६ सदस्यांचं बहुमत आहे. तुम्हाला जर हा प्रश्न मार्गी लावता येत नसेल आरक्षणाचा दोन्ही समाजाला समाधान होईल असा निर्णय घेता येत नसेल तर या सरकारनं सत्तेतून बाहेर पडावं. आम्ही नक्की त्या विषयावर मार्ग काढू.

 विधान परिषदेचे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनीही या मुद्यावरून विरोधकांवर टीका केली आहे. हा प्रश्न असाच प्रलंबित रहावा, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची इच्छा दिसत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

 दरम्यान, सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर एकमत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

****

दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याची राज्य शासनाची तयारी असून, विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या मोठ्या शहरांमधल्या शासकीय रुग्णालयांमधल्या, विविध आजारांची तपासणी करणाऱ्या यंत्रणा तसंच जनरेटरची व्यवस्था अशा बाबींचा आढावा घेण्यात येईल आणि त्यात काही त्रुटी आढळल्या तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य रमेश कोरगावकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात चार टक्के वाढ केली असून आता महागाई भत्ता पन्नास टक्के इतका झाला आहे. या वर्षीच्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार असून, याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. महागाई भत्त्यातली ही वाढ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू होणार आहे.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते उद्या संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात आज झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

 मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर तसंच वाशीम जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड शहरात सकाळी भूकंपाचे हादरे बसले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात ज्या घराची छत पत्र्याचं आहे आणि ज्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते दगड त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या उपक्रमाला छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून प्रारंभ झाला. महानगर पालिकेच्या प्रियदर्शनी केंद्रीय प्राथमिक शाळेत नामवंत बालरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं उद्‌घाटन झालं. यामध्ये मान्यवरांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना संतुलित आहार, जंकफूडचे दुष्परिणाम, व्यायामाचं महत्त्व तसंच स्क्रीनटाईम या विषयांवर मार्गदर्शन केलं. महापालिकेच्या उर्वरित नऊ केंद्रीय शाळांमध्ये उद्या हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई नं इयत्ता तिसरी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केल्याचं स्पष्ट केलं आहे. बाकीच्या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल केलेला नसून, शाळांनी इयत्ता तिसरी आणि सहावी सोडून बाकीच्या सर्व इयत्तांसाठी मागच्या वर्षी उपयोगात आणलेल्या पाठ्यपुस्तकांचाच वापर करावा असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

सीमा सुरक्षा दलात नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांना हरियाणात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं परवा सोमवारी वीरमरण आलं. कदम हे नांदेडचे रहिवासी होते. नांदेड इथं उद्या, गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

भारत आणि झिम्ब्वॉब्वे संघात टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना सध्या हरारे इथं सुरू आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघानं निर्धारित २० षटकांत चार बाद १८धावा करत, यजमान संघाला १८३ धावांचं आव्हान दिलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...