आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अमरनाथ यात्रेसाठी जम्मू इथल्या भगवती नगर इथून सात हजार ९१९ भाविकांची सातवी तुकडी आज सकाळी रवाना झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा सुरळीतपणे सुरु आहे.
****
झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी काल शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
पॅरिस इथं होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेआधी बहुतेक खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एम ओ सी, अर्थात मिशन ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात नेमबाज रिदम संगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांचा समावेश आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगीड यांनी काल जवाहर नवोदय विद्यालयात ११ रोपे लावून यंदाच्या वन महोत्सवाची सुरुवात केली. जांगीड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, कठोर परिश्रम करून उज्ज्वल भविष्याचा पाया आत्ताच मजबूत करण्याचं आवाहन केलं.
****
कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या धोंडराईचे मंडळ अधिकारी पुर्षोत्तम आंधळे आणि राक्षसभूवन सज्जाचे तलाठी यांचं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी लिलंबन केलं आहे. वेळोवेळी अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
****
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातल्या दारिद्रय रेषेखालच्या भूमिहीन नागरिकांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातले जे शेतकरी शासनास जमीन विक्री करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क करण्याचा आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने सायकल वारीची सुरुवात आज सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथून करण्यात आली. यंदा ४० महिलांसह ३०० सायकल वारकरी यात सहभागी झाले आहेत.
****
1 comment:
Post a Comment