Saturday, 6 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून

·      देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता - केंद्र सरकारची माहिती

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टनंतरच्या अर्जांचाही विचार होणार, हिंगोली जिल्ह्यात योजनेसंदर्भात लाचखोर ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

आणि

·      भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पहिल्या टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरु होणार आहे. २३ जुलै रोजी २०२४-२५ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येईल. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.

****

रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन १९१ लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी ते पुरेसं आहे, अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे.

****

नीट यूजी समुपदेशन स्थगित केलं नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंबंधी समाजमाध्यमांवरील संदेशांबाबत मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं सहकार से समृद्धीसंमेलन घेण्यात आलं. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत असल्याचं, शहा यांनी नमूद केलं.

दरम्यान, सहकार दिनानिमित्त अमित शहा आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक माध्यमावर शुभेच्छा दिल्या आहेत.

****

मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटमध्ये जर कोणत्याही जिल्ह्याचा उल्लेख असेल तर त्याचा आरक्षणासाठी लाभ होईल, या संदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतली जात असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल नांदेड इथं चव्हाण यांची भेट घेतली, त्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. आजपासून मराठवाड्यात सुरू झालेल्या मराठा आरक्षण संवाद यात्रेला कोणाचाही विरोध नसल्याचं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

****

दरम्यान, जरांगे यांच्या उपस्थितीत आज हिंगोलीत भव्य मेळावा घेण्यात आला. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. येत्या १३ जुलै पर्यंत आपण शासनाच्या निर्णयाची वाट पाहू, त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असं जरांगे यावेळी म्हणाले.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या १५ जुलै पासून दर सोमवार आणि शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत कामगार पालक दिनभरवण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या लहानमोठया समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विभाग नियंत्रकांनी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिले आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या धोडराज परिसरात आज सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात दोन जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

मुंबईत जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी वायकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या चार भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं यासंदर्भात दाखल करण्यात आलेली तक्रार, अपुरी माहिती आणि गैरसमाजावर आधारित होती, असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे.

दरम्यान, यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, वायकरांना क्लिन चीट देणं म्हणजे भाजप भ्रष्ट नेत्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर बोलताना त्यांनी, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचं म्हटलं आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज सातारा जिल्ह्यात नीरा नदीच्या तीर्थात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. नीरा स्नानानंतर ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यानं लोणंद मुक्कामासाठी प्रस्थान ठेवलं.

****

परभणी इथल्या प्रभावती सायकल रायडर्स ग्रुपच्या वतीने परभणी ते पंढरपूर सायकल वारी निघाली आहे. या वारीचं हे सहावं वर्ष असून, वारकरी सुमारे ३०० किलोमिटर अंतर तीन दिवसात पार करून पंढरपूर इथं पोहचणार आहेत. यात ३० जण सहभागी झाले असून, पर्यावरण संवर्धनासाठी ५०० सिड्स बॉल तयार करून रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत टाकण्यात येणार आहेत.

****

पंढरपूर इथं अहिल्या भवनसाठी पाच कोटी निधीसह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांना निवदेन दिलं. मागण्या मान्य न झाल्यास येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पहाटे विठ्ठल मंदिराला शेळ्या-मेंढ्यांसह प्रदक्षिणा घालत आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळानं दिला आहे.

****

नीटपरीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेला लातूर इथला संशयित आरोपी संजय जाधव याला आठ जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी जलिल खान पठाण याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

दरम्यान, आरोपी संजय जाधव याच्या मोबाईलमधून दिल्लीतल्या गंगाधर नामक आरोपीचा पत्ता सापडल्यामुळे त्याला आंध्रप्रदेश मध्ये अटक केल्याचं सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं. सध्या गंगाधर हा सीबीआय कोठडीत असून त्याची बंगळुरू इथं चौकशी सुरू आहे.

****

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही निरंतर चालणारी योजना असून, ३१ ऑगस्टपर्यंत जर कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही तरी, नंतर येणाऱ्या अर्जांचाही अनुदानासाठी विचार केला जाईल, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नंदुरबार इथं वार्ताहारंशी बोलत होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ असल्यामुळे पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

****

हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतल्या लाभार्थी महिलेकडून १०० रुपये लाच घेणार्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा आणि भाटेगाव इथला ग्रामसेवक मुकुंद घनसावंत हा या योजनेतल्या लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्रासाठी अनधिकृत रित्या वसुली करत होता. यासंदर्भातला एक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लिंबाजी बारगीर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर कसा राहील, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज सोलापूर इथं झालेल्या एका आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेतून राज्यातल्या सुमारे तीन कोटी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये शासन देणार असून, यासाठी प्रतिवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या तीन टी-ट्वेन्टी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात अभिषेक शर्मा आणि रियान पराग या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हरारे इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटं वृत्त हाती आलं तेंव्हा झिम्बाब्वेच्या १षटकांत नऊ बाद ९१ धावा झाल्या होत्या.

****

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या केकत सारणी इथं काही तरुणांनी आगळंवेगळं आंदोलन पुकारलं आहे. हे तरुण गावातील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातल्या तेलगाव कारखान्याजवळ खामगाव-पंढरपूर या दिंडी मार्गावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड असं मृत वारकऱ्याचं नाव असून, ते परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या लाडनांद्रा इथले रहिवासी होते.

****

जालना शहरात आज १६ केंद्रावर कोतवाल भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरता परीक्षा हॉलचं वेबकास्टींगद्‌वारे चित्रीकरण करण्यात आलं. जिल्हा नियंत्रण कक्षातून स्वत: जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखरेख केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...