Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 07 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्राला या वर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरण रक्षणासह अन्न सुरक्षितेद्वारे राज्य सरकारनं राबविलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं या पुरस्काराची घोषणा केली. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी दुप्पट करणं, लाखो शेतकऱ्यांना नॅनो खतांचं वितरण, तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा, भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य, त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद आणि तृणधान्यांना किमान आधारभूत किंमत देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. बांबू लागवड, आणि औष्णिक वीजनिर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावलं राज्यानं उचलली आहेत.
बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपायांचं अनुदान देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. नवी दिल्ली इथं दहा जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज प्रारंभ होत आहे. यंदा विशिष्ट खगोलीय परिस्थितीमुळे, १९७१ नंतर प्रथमच यात्रा दोन दिवस चालणार आहे. सर्व विधी झाल्यावर आज दुपारी भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांचे तीनही रथ ओढणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज या यात्रेत सहभागी होत आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या उत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेछा दिल्या आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत चार अतिरेकी ठार झाले. यात एका अतिरेकी कमांडरचा समावेश आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यात मोडरगाम आणि फ्रिसल चिन्नीगाम या गावांमध्ये शोधमोहीम सुरू असताना झडलेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार, तर दोन जवानही हुतात्मा झाले. त्याशिवाय, एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांध्ये अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथल्या जवान प्रविण जंजाळ यांचा समावेश आहे. त्यांचं पार्थिव आज नागपूर इथं आणलं जाणार आहे.
****
आसाममध्ये आलेल्या पुरात गेल्या २४ तासांत आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्यानं पुरातल्या मृतांची संख्या ५८ झाली आहे. राज्यातील ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान विभागानं आसाममध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे.
****
नाशिक-मुंबई महामार्ग दुरवस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या मुंबई इथं बांधकाम विभागाचे सचिव आणि नाशिक जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक होत आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर शहापूर ते ठाण्यादरम्यान अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह पुलाचं काम सुरू आहे. तसंच, पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं रोज वाहतूक कोंडीही होत असून, नाशिक ते मुंबई या चार तासांच्या अंतरासाठी खूप जास्त वेळ लागत आहे.
****
शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर आषाढी वारी पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. शहरवासीयांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही इस्कॉनच्या मधुवन केंद्रातर्फे श्री जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी तीन वाजता पैठण गेट, गुलमंडी, समर्थनगर, अदालत रोड असा या रथाचा मार्ग आहे.
****
देवगिरी किल्ल्यावर २५ जुलै हा दिवस स्वराज्य प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्वराज्य तोरण प्रतिष्ठानच्या वतीनं काल दौलताबाद इथल्या दत्त मंदिर आश्रमात घेण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव, दोन भाऊ आणि भाच्याची निजामानं २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी किल्ल्यावर विश्वासघातानं हत्या केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणास्तंभदेखील उभारण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे कार्यवाह राहुल भोसले यांनी सांगितलं. यावेळी इस्कॉनचे रुक्मिणीरमण प्रभुदास महाराज, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे, संयोजक मनीष पाटील आदी उपस्थित होते.
****
राज्यात अनेक ठिकाणी आज पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. नाशिक जिल्ह्यासह शहरात सकाळीच पावसाला सुरूवात झाली. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर बऱ्याच ठिकाणी कमी अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
स्पेनच्या माद्रिद इथं ग्रां प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या पन्नास किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगटनं रशियाच्या मारिया ट्युमेरेकोव्हावर दहा-पाच अशी मात केली. विनेश आता पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी वीस दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना होत आहे.
****
No comments:
Post a Comment