Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 07 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०७ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
ओडिशातल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला
सुरुवात
·
ऊर्जा विभागाच्या तिनही कंपन्यांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या मूळ
वेतनात आणि सर्व भत्त्यांमध्ये वाढ
·
येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची
- छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन
·
पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचं
दर्शन २४ तास सुरु राहणार
आणि
·
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे
जनजीवन विस्कळीत
****
ओडिशातल्या
जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. भगवान
जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांचे तीनही रथ ओढण्यास प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या यात्रेत
सहभागी झाल्या आहेत. प्रथेला फाटा देत यावेळी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा
आणि भगवान बलभद्र या तिन्ही भावंड देवतांचा समावेश असलेले अनेक विधी एकाच दिवशी केले
जातील. जगन्नाथाची रथयात्रा एक दिवसाची असते, परंतु
विशिष्ट खगोलीय व्यवस्थेमुळे, ती या वर्षी दोन दिवस चालणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथं इस्कॉनच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा
मार्गाने ही रथ यात्रा भाग्यनगर इथल्या इस्कॉन मंदिरात पोहोचत आहे. या रथ यात्रेत मोठ्या
संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
नाशिकमध्ये
पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पर्यावरण रक्षणाबाबतही
जनजागृती करण्यात आली.
****
आपल्या
प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार
करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचं कौशल्य विकसित करा, असं आवाहन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना
केलं आहे. नागपूर इथं विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा
ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या वेदिक-महिंद्रा कौशल्य
विकास केंद्राचं गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, त्यावेळी
ते बोलत होते. देशाला पेट्रोल-डिझेलमुक्त करण्याचं आपलं ध्येय असल्याचं सांगत गडकरी
यांनी, डिफेन्सच्या उपयोगाकरता आऊटर रिंग रोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानाने युक्त १३२
आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
****
मुंबईमध्यल्या
वरळी इथं झालेल्या हिट अँड रन दुर्घटनेतल्या दोषींना पाठीशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. आज पहाटे वरळी
इथं एका भरधाव चारचाकीने एका दांपत्याला फरपटत नेल्याची घटना घडली, यात महिलेचा
मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, योग्य
ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कायद्यासमोर सगळे समान. सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो. त्यामुळे
ही घटना जी आहे, याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही. जे होईल ते कायदेशीर
होईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत. आणि कोणालाही वाचवण्याचं काम
पोलीस करणार नाहीत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून या घटना वारंवार होऊ
नयेत, यासाठी देखील शासन म्हणून यामध्ये गृहविभाग नक्की उपाययोजना करेल. परंतू या केस
मध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.
विधानपरिषदेच्या
निवडणुकीत महायुती नऊ पैकी नऊ जागा जिंकेल, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय
जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर आज
शिंदे यांनी बावनकुळे यांची नागपूर इथं भेट घेतली.
****
राज्याच्या
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती, विद्युत
वितरण आणि विद्युत पारेषण या कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यांच्या
मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येणार आहे. मुंबईत
आज या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात
आली. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची
वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता आता ५०० वरुन एक हजार रुपये करण्यात
आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
येणारी
विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं मत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. मागील दहा वर्षात केंद्र
सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी, सरकारवर
टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत, अशी मागणीही
त्यांनी केली. एकमेकांत भांडण्यात शक्ती वाया न घालवता एकजूट दाखवून आपल्या मागण्या
केंद्र सरकारकडून पुर्ण करुन घ्याव्यात, असं आवाहन ठाकरे यांनी
यावेळी केलं.
भारतीय
जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांनी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षात प्रवेश केला.
****
पंढरपूर
इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन
२४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलै पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस
तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर
प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत शेड, आपत्कालिन
गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालयं तसंच बसण्याची सुविधा करण्यात आली
आहे.
****
आषाढी
वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात
आगमन झालं. शहरवासीयांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. उद्या ही पालखी तुळजापूरला
जाणार आहे.
जगद्गुरु
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या
खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाले होते.
****
लातूरच्या
विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या
वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक
आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकाकडून
दिंडीतल्या वारकऱ्यांना गरजेनुसार मोफत उपचार आणि औषधी पुरवली जाणार आहे.
****
मुंबईसह
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं
आहे.
मुसळधार
पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला
जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई
परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे
मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत
आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात
राष्ट्रीय अपत्ती दलाच्या पथकाला यश आलं आहे.
नाशिक
जिल्ह्यासह शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला
नाल्याच्या पुरात वाहून गेली.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली
गेले आहेत, त्यामुळे वस्तीला गेलेल्या एसटी गाड्या अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी पडझड होऊन
मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातले नदी, ओढे, तलाव ओसंडून
वाहत आहेत. अनेक बंधार्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. आज दुपारी पंचगंगा नदीचं पाणी
पात्राबाहेर आलं आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं
नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारत आणि
झिम्बाब्वे दरम्यानच्या पाच टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना
आज हरारे इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या
२० षटकांत दोन बाद २३४ धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मानं ४७ चेंडुत १०० धावा केल्या.
****
बीड इथल्या
पोलिस भरती लेखी परिक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा नेकनूरजवळ
आज अपघाती मृत्यू झाला. दिंद्रड ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र नन्नवरे आणि सिरसाळा
ठाण्याचे उपनिरिक्षक रमेश नागरगोजे हे दुचाकीने बीडकडे निघाले होते, त्यावेळी
नेकनूरकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं हा अपघात
झाला, यात नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर चारचाकी वाहनचालक फरार झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जम्मू
काश्मीर मधल्या कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या
चकमकीत दोन सैनिकांना वीरमरण आलं. यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव - भाकरे इथल्या
प्रवीण जंजाळ यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment