आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
०७ जूलै २०२४ सकाळी ११.००
वाजता
****
जम्मू
-काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकींत चार अतिरेकी ठार झाले. यात एका अतिरेकी कमांडरचा समावेश आहे.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यात मोडरगाम परिसरात गुप्त माहितीद्वारे तपासणी अभियानादरम्यान, तर त्यानंतर फ्रिसल चिन्नीगाम गावात झालेल्या चकमकीत चार जण मारले गेले.
तसंच दोन जवान हुतात्मा, तर अन्य एक पोलिस
जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या
जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज प्रारंभ होत आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा
यांच्या या रथयात्रेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होत आहेत.
दरम्यान, या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथंही
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ-इस्कॉनच्या मधुवन केंद्रातर्फे
श्री जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी तीन वाजता पैठण गेट,
गुलमंडी, समर्थनगर, अदालत
रोड असा या रथाचा मार्ग आहे. संध्याकाळी सातनंतर केंद्रामध्ये महाआरती होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त
काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं 'सहकार से समृद्धी' संमेलन घेण्यात आलं. केंद्रीय
सहकार मंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा
महत्त्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत असल्याचं शहा यांनी नमूद
केलं.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस
ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात
आली असून, ती
मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल. तर बल्लारशा - मुंबई नंदीग्राम
एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून, या
दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयानं ही माहिती दिली.
****
पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर
त्या पदार्थांतली एकंदर साखर, मीठ आणि मैद्याच्या प्रमाणाची माहिती ठळक-मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावास भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं
मान्यता दिली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. आपण वापरत
असलेल्या उत्पादनाचं पौष्टिक मूल्य ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजावं, हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची, तर
बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा
वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर बऱ्याच ठिकाणी कमी अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment