Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली पाणी साचलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातल्या सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सांगण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन त्यांनी ट्विट संदेशातून केलं आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक, लवकरच पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि ती पूर्ववत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी, यासंदर्भात माहिती देतांना, सध्या कुर्ला आणि सायन या दोन ठिकाणी पाणी साचलेलं असून, त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं सांगितलं. येत्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा केसरकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मध्य रेल्वे सेवा सध्या बंद असून सर्व लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटं उशिराने धावत आहेत. मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी या रेल्वेगाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आणि त्या पुढे धावणार नसल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली.
****
विधान परिषदेत आज अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, या चर्चेत सहभागी होत हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, महिला तसंच उपेक्षितांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. सीमाभागातल्या मराठी शाळा, रायगड पर्यटन आराखडा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्यासह विविध मागण्याही दरेकर यांनी सरकारकडे केल्या.
****
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले निरंजन डावखरे, किशोर दराडे, आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
****
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
फुलंब्री इथल्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. उज्ज्वला पालकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पुण्यात झिकाचा प्रसार वाढत असून शहरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात ४२ वर्षीय महिलेला, तसंच खराडी इथल्या एका २२ वर्षीय तरुणाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार पासूनच्या संततधार पावसामुळे अनेक प्रकल्प तुटुंब भरले आहेत. खामगाव तालुक्यात शेतपिकाचं मोठं नुकसान झालं असून, रस्ते वाहतूक बंद झाली आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या परिसरातल्या गावांचा संपर्क तुटला आहे.
****
पुण्यात निगडी इथं बेकायदा घुसखोरी करून राहणाऱ्या ४२ बांगलादेशी लोकांचे भारतीय पासपोर्ट पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने रद्द केले आहेत. निगडी परिसरात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केल्याचं, वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक मध्ये अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनानं, उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिल्यानं एक ठार तर तिघे जखमी झाले. चांदवड-मनमाड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अवैध मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना, आरोपींच्या गाडीनं पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment