Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०७ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हास्तरावरील सर्व
यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
·
छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या
कामाला लवकरच सुरुवात
·
नीट प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधवला १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी
आणि
·
मराठवाड्यात नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची
गरज कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून व्यक्त
****
राज्यात
सर्वदूर सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क
आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातल्या
पाऊस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला
आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत रात्रीपासून सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाला, अतिवृष्टीच्या
निकषापेक्षा हे प्रमाण अत्याधिक असल्याने, ही परिस्थिती
उद्भवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई
महापालिकेनं केलेल्या होल्डिंग पाँण्डस् आणि मायक्रो टनलिंग यामुळे पूर्वी पाणी साचण्याच्या
ठिकाणी यंदा पाणी साचलं नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मिठी नदीला फ्लड गेट
बसवण्यात येत असल्याने, भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
दरम्यान, स्वतःच्या
अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची टीका, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी
बोलत होते. राज्याच्या अनेक भागात पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. अनेक
गावांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अजूनही पायपीट करावी लागत आहे. जनावरांच्या
चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे, यासंदर्भात सरकार मंत्रालयातून
आदेश देतं, पण प्रशासन काहीच काम करत नाही, याकडे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न
पटोले यांनी विचारला.
****
मुंबईतील
नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार
यांनी केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील
मोठे नाले, छोटी गटारे यांची सफाई कंत्राटदारानं योग्य केली नाही, आपण दौरा
करुन ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, तरीही
ही कामं झाली नसल्याने, याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी
त्यांनी विधानसभेत केली.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व आगारांमधल्या मिळून ४०५ बसफेऱ्या
रद्द करण्यात आल्या. विभागप्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जिल्ह्यातल्या
खेड तालुक्यातली जगबुडी आणि राजापुरातली कोदवली या दोन नद्या इशारा पातळीच्या वरून
वाहत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधान
परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित
आमदार निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जगन्नाथ अभ्यंकर
यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. नाशिक
शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे पावसामुळे शपथग्रहणासाठी पोहोचू
शकले नाहीत, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांचा आमदारकीचा कार्यकाळ
२७ जुलैपर्यंत असल्यानं त्यांचा शपथविधी नंतर होणार असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी
दिली.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं, खासदार
डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं आहे. कराड यांनी आज विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात
आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाच्या
विस्तारीकरणाच्या कामासाठी १३९ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर
छत्रपती संभाजीनगरहून एयर रशियाची विमान सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. शहरवासियांना
दररोज पेयजल पुरवठ्यासंदर्भात समांतर जलवाहिनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या
असून आतापर्यंत ३२ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम झालं आहेत, तर आठ
जलकुंभ उभारण्यात आल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
****
'नीट' परीक्षा
गैरव्यवहार प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधव याला १४ दिवसांची न्यायालयीन
कोठडी सुनावण्यात आली आहे. जाधव याची सीबीआय कोठडी आज संपल्यानं, त्याला
लातूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला, १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीतल्या गंगाधर नामक आरोपीला आंध्र प्रदेशात
अटक झाली असून, सीबीआयचं पथक त्याला अटक करून लातूरमध्ये आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
आहे. इरण्णा कोनगलवार हा आरोपी अद्यापही फरार असून सीबीआय त्याचाही कसून शोध घेत आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातील सेनगाव इथं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी
महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा
वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार
मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेनं उपस्थित होते.
****
राज्य
सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे
घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे
५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी
अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई
करण्यात आली.
****
मराठवाड्यात
नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची गरज, हैदराबाद
मुक्ती संग्रामाचे अभ्यासक तसंच राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी
व्यक्त केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या
'खळाळल्या शृंखला' या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन, दिवेगावकर
यांच्या हस्ते आज पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. भाषा सल्लागार
समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामंतशाही
राजवट आणि स्वातंत्र्याला झालेला उशीर, यामुळे मराठवाडा मागास
राहिल्याचं निरीक्षण दिवेगावकर यांनी नोंदवलं.
****
नांदेडमध्ये
आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज नांदेड सध्या जाहीर सभा होत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे
पाटील यांच्या उपस्थितीत उद्या लातूर इथं शांतता रॅलीसह सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर आज लातूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
****
परभणी
जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये
प्रवेश देण्यासाठी १४ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या शाळांमध्ये प्रवेशित
विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य आणि
शालेय गणवेश यासुविधा शासनाकडून मोफत पुरवण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचं
वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी असावी. यासाठीचे अर्ज सहायक संचालक इतर मागास
बहुजन कल्याण, परभणी यांच्या नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इथं सादर
करण्याचं आवाहन सहायक संचालक गीता गुठ्ठे यांनी केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आमखास मैदान लगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन
पार्क, तारांगण आणि नावीन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीनं
आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा
प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव देहावर त्यांचं मूळ गाव मोरगाव भाकरे इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काश्मीर मध्ये अतिरेक्यांबरोबर नुकत्याच झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं होतं.
****
परभणी
तालुक्यातील परभणी शहर आणि ग्रामीण भागातील विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा
लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी पुढील १५ दिवसांत कागदपत्रं सादर करण्याचं
आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना-श्रावणबाळ
राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या अनेक योजना राज्य सरकारकडून जनतेसाठी
राबवल्या जातात.
****
महाराष्ट्र
मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ च्या दुसरा टप्प्याला ३१ ऑगस्ट
२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, बीडच्या सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment