Monday, 8 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:08.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट युजी संदर्भात फेरपरीक्षेच्या मागणीसह संबंधित २६ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

·      ऊर्जा विभागाच्या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यात वाढ

·      पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन २४ तास सुरु

आणि

·      मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकण विभागात जनजीवन विस्कळीत

****

नीट युजी ची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह संबंधित अन्य २६ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. नीट युजी परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांमुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे. मात्र या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं परीक्षा पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे.

****

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती, विद्युत वितरण आणि विद्युत पारेषण या कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येणार आहे. मुंबईत काल या तिनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ, आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता आता ५०० वरुन एक हजार रुपये करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

मुंबईमध्यल्या वरळी इथं झालेल्या हिट अँड रन दुर्घटनेतल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. काल पहाटे वरळी इथं एका भरधाव चारचाकीने एका दांपत्याला फरपटत नेल्याची घटना घडली, यात महिलेचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती नऊ पैकी नऊ जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर काल शिंदे यांनी बावनकुळे यांची नागपूर इथं भेट घेतली.

****

येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. मागील दहा वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी, सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. एकमेकांत भांडण्यात शक्ती वाया न घालवता एकजूट दाखवून आपल्या मागण्या केंद्र सरकारकडून पुर्ण करुन घ्याव्यात, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.

भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांनी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

****

पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलै पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री तसंच जादा पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालयं तसंच बसण्याची सुविधा करण्यात आली आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपुरला निघालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं. शहरवासीयांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. आज ही पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ होत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं तरडगाव इथलं चांदोबाच्या लिंबावरचं पहिलं उभं रिंगण आज होणार आहे. अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा आज लोणंद येथून मार्गस्थ होणार आहे.

****

लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक काल वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं.

****

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात राष्ट्रीय अपत्ती दलाच्या पथकाला यश आलं.

नाशिक जिल्ह्यासह शहरात काल सकाळपासून पाऊस सुरु होता. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत. कुडाळ नजीक पावशी इथं महामार्गावर पाणी आल्याने गेल्या १२ तासांपासून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या पूरपातळीवरून वाहत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तीन नद्या इशारा पातळीच्या वरून, तर एक नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. परिणामी जिल्ह्यातले नदी, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक बंधाऱ्यांवरुन पाणी वाहत आहे. काल दुपारी पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं. जिल्ह्यातल्या अनेक भागात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात काल परभणी इथं शांतता संवाद रॅली काढण्यात आली. १३ जुलै पर्यंय सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे कारायचे की सरकारचे उमेदवार पाडायचे हे ठरवू, असा इशारा जरांगे यांनी दिला.

दरम्यान, जरांगे यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. शहरातल्या सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या प्रार्थमिक ते उच्च माध्यमिक शाळांना आज एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

****

हरारे इथं काल झालेल्या दुसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा शंभर धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात दोन बाद २३४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ४७ चेंडुत शतक झळकावलं. ॠतुराज गायकवाडने नाबाद ७७, तर रिंकू सिंगनं नाबाद ४८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला झिम्बाब्वेचा संघ १९व्या षटकात १३४ धावांवर सर्वबाद झाला. मुकेश कुमार आणि आवेश खाननं प्रत्येकी तीन, रवी बिश्नोईनं दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. मालिकेतला तिसरा सामना येत्या बुधवारी दहा तारखेला होणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल चेन्नई इथला दुसरा टी - ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द झाला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकात १७७ दावा केल्या. त्यानंतर मुसळधार पावसामुळे सामना रद्द करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

बिलियर्ड्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद भारताच्या ध्रुव सितवाला यानं पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं भारतात्याच पंकज अडवाणीवर पाच - दोन अशी मात केली. या पराभवामुळे या स्पर्धेचं जेतेपद सलग तिसऱ्यांदा मिळवण्याची पंकज अडवाणीची संधी हुकली आहे.

****

जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लेंभेवाडी शिवारात काल कार आणि दुचाकीच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. काल संध्याकाळच्या सुमारास भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दूभाजकावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीला धडकली. तेजल आणि अतिश मगरे असं मृत दाम्पत्याचं नाव असून, ते अंबड तालुक्यातल्या पाथरवाला इथले रहीवाशी होते.

****

बीड इथल्या पोलिस भरती लेखी परिक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा नेकनूरजवळ काल अपघाती मृत्यू झाला. दिंद्रड ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र नन्नवरे आणि सिरसाळा ठाण्याचे उपनिरिक्षक रमेश नागरगोजे हे दुचाकीने बीडकडे निघाले होते, त्यावेळी नेकनूरकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला, यात नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर चारचाकी वाहनचालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिकमधल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक इथं काल प्रतिष्ठानच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...