Monday, 8 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 08.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०८ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी, दोन्ही देशांमधल्या संपूर्ण बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील.

****

अंमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या जम्मू - काश्मीरमधल्या फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी हा जून २०२० पासून फरार होता. पाकिस्तान सीमेवर बंदी असलेल्या लष्कर - - तय्यबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी जवळीक साधून अंमली पदार्थ तस्करांच्या मदतीनं असे पदार्थ भारतात विक्री करुन त्या पैशातून दहशतवादी कारवायांना बळ देण्यासाठीचा हा कट होता, असं तपासात निष्पन्न झालं आहे.

****

राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या निरंजन डावखरे, किशोर दराडे, आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.

****

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेणाऱ्या सोलापूर शहरातल्या दोन ई - सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.

****

भारताच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फ्रान्समध्ये पॅरिस डायमंड लिग स्पर्धेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आठ मिनिटं नऊ सेकंद वेळ नोंदवत अविनाश या स्पर्धेत सहावा आला. यापूर्वीचा विक्रम देखील त्याच्याच नावावर होता.

****

मुंबईत गेल्या सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होत असून, उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या आजही रद्द आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...