Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 09 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०९ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
भारत रशिया संबंध येत्या काळात अधिक दृढ होतील-पंतप्रधानांकडून
विश्वास व्यक्त
·
वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला
शहापूरमधून अटक
·
बीड जिल्ह्यातल्या पाच महसूल मंडळात
अतिवृष्टीची नोंद
आणि
·
कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासाठी जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात
विशेष जनजागृती मोहीम
****
भारत रशिया
संबंध येत्या काळात अधिक दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला
आहे. आपल्या रशिया दौऱ्यात आज मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत
झालेल्या बैठकीत हा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, कोविड
आपत्ती, इंधन समस्या, आदी मुद्यांवर उभय नेत्यांमध्ये या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, मॉस्को
इथं भारतीय नागरिकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला, आपल्या
तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टाचा
मोदी यांनी पुनरुच्चार केला. भारतीय नागरिकांचं रशियाच्या प्रगतीत योगदान असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
वरळी हिट
अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे
उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असलेल्या मिहीरने शनिवारी रात्री मद्यप्राशन करून वाहन
चालवत असतांना, वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला धडक दिली, त्यात
कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मिहीर फरार होता, त्याला
पोलिसांनी आज शहापूर इथून अटक केली. मिहिरची आई तसंच बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात
आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, मिहीरला
ताब्यात घ्यायला ६० तासांचा कालावधी का लागला, असा प्रश्न
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात माध्यमांशी
बोलतांना मिहीरवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली.
****
राज्यात
बनावट पॅथॉलोजी लॅब वर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा मंत्री
उदय सामंत यांनी केली आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात
त्यांनी ही माहिती दिली. याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता, त्याला
उत्तर देताना, सामंत यांनी, या कायद्यात दर नियंत्रण, कलेक्शन
सेंटर नोंदणी तसंच फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल, अशी माहिती
दिली. कायदा अस्तित्वात येईपर्यंत राज्यभर जिल्हावार पथकं तयार करून पॅथॉलोजी लॅब ची
तपासणी केली जाईल, तसंच कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग
कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.
****
बिगर व्यावसायिक
अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या फक्त मुलींचेच नाही तर मुलांचेही १०० टक्के शुल्क
सरकारकडून भरण्याबाबतचा शासन निर्णय ७ ऑक्टोबर २०१७ रोजी निर्गमित करण्यात
आला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.
दरम्यान, व्यावसायिक
अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या काही प्रवर्गातील मुलींना शिक्षणात १०० टक्के सवलत देण्याचा
शासन निर्णय जारी झाला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक
आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींचा यात समावेश असेल
असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा निर्णय लागू करण्यात
येणार असून त्यासाठी ९०६ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
****
अत्युच्च
गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णय
जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्यानं क्रीडा विभागात नियुक्ती देण्याच्या
दृष्टीनं त्यांच्या क्रीडा अर्हतेमधे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑलिंपिक क्रीडा
स्पर्धेत समाविष्ट असलेले सर्व खेळ थेट नियुक्तीसाठी पात्र राहतील. या नियुक्तींसाठी
शालेय आणि क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली एकूण ५५१ पदं निर्माण केली जाणार आहेत.
****
मुंबईत
उपनगरी रेल्वे मार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे
करण्याचा प्रस्ताव विधान परिषदेने आज एकमताने मंजूर झाला. मंत्री दादा भुसे यांनी हा
प्रस्ताव मांडला आणि सभागृहाने आवाजी मतदानाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभेतही
हा ठराव एकमताने मंजूर झाला.
****
विधानसभेने
विनियोजन विधेयक आज मंजूर केलं. त्यापूर्वी महसूल, वने, ग्रामविकास, सार्वजनिक
आरोग्य तसेच महिला बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेने आज मंजूर केल्या.
****
राज्यातील
रुग्णवाहिका घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांसाठी दिलेली १० हजार कोटी रुपयांची
निविदा रद्द करुन विशेष तपास पथकाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील मागण्यांवरील चर्चेदरम्यान
ते बोलत होते. राज्याची खुलेआम लूट सुरू असून ३० टक्के दराने कमिशन मागितले जात असल्याचा
आरोप वडेट्टीवार यांनी केला.
****
विधान
परिषदेचं सभापतिपद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असून, या पदाची
निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. महाविकास आघाडीच्या
शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची आज भेट घेऊन त्यांना या मागणीचं निवेदन सादर
केलं. १४ व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. पर्यायाने विधान परिषदेचंही या शासन
कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन असेल, याकडेही या निवेदनातून
लक्ष वेधण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील
पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यातील अंमळनेर महसूल मंडळात
झाला. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आणखी
मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात
काल झालेल्या जोरदार पावसात अहमदनगर मार्गावर कडा इथला पूल वाहून गेला. कडी नदीवर पुलाचं
बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी हा पुल तात्पुरता बांधण्यात आला होता. या
मार्गावरुन वाहतुकीसाठी पर्याय मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आज छत्रपती
संभाजीनगर शहरातही आज पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर
आणि वाळूज परिसरात जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
बालविवाह
रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे. मीना यांच्या अध्यक्षते
खाली आज महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बालविवाह
रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक दहा-नऊ-आठ गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणं, इयत्ता
दहावी तसंच बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थिनींचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचं मीना यांनी
नमूद केलं.
****
लातूर
जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी १२५ निवडक शाळांमध्ये इयत्ता सहावी
ते दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा
कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
ग्रामीण
भागातील कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ ऑगस्ट
पर्यंत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी ही माहिती दिली. प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन
रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वच्छतेचे
दोन रंग अभियानाची जालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या परिसरातील आणि घरातील
ओला, सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे. मीना यांच्या मार्गदर्शनात ८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान
हे अभियान राबवण्यात येत आहे. या दरम्यान, गृहभेटीतून
कुटुंबांना स्वच्छतेची माहिती दिल्यासंदर्भात गुगल फॉर्म भरुन घेतले जाणार आहेत.
****
माजी गृहराज्यमंत्री
डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
पक्षाने नांदेड अथवा मराठवाड्यात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नसल्याने त्यांनी पक्ष
सदस्यत्वाचा आणि पक्षातील इतर सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांच्याकडे सोपवला.
****
अंबाजोगाई
इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन मशीन बसवण्यासाठी राज्य शासनाने
१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मागील आठ महिन्यापासून रुग्णांची होणारी गैरसोय
लक्षात घेत केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या मागणीसाठी पाठपुरावा
केला होता. त्यानुसार शासनाने आज या सीटी स्कॅन मशीन साठीच्या निधी मंजुरीचे आदेश जारी
केले.
****
नोटरी
वरील मालमत्ता धारकांची फेर लावण्याची प्रक्रिया मागील दीड वर्षापासून परभणीच्या महानगरपालिकेनं
बंद ठेवल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
केली. ही प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, गंगाखेड रस्त्याचं नूतनीकरण
करावं, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी दोन
बांधकाम व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
यांच्या आदेशानुसार या साठी स्थापन पथकानं ही कारवाई करत, दोघांकडून
५० हजार रुपये दंड वसूल केला.
****
No comments:
Post a Comment