Wednesday, 10 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 10.07.2024 रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 July 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी एक डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला तर अन्य एकोणीस जण जखमी झाले. ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती. अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

****

मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या भागात पहाटे भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे हादरे बसले, तर परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळून मोठी पडझड झाली.

नांदेड शहरात सकाळी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.

भूकंपाचे हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, असं आवाहन नांदेड तसंच हिंगोली जिल्हा प्रशासनांनी केलं आहे. गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते त्यांनी त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आजही विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत, हिट ॲण्ड रन, महिला सुरक्षा आदी मुद्यांवरून घोषणाबाजी केली.

****

मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. याबाबतच्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित न राहिल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येताच, विरोधकांनी आणि त्याच्या उत्तरात सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटं आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.

****

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा घेणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते आज विधानसभेत संजय सावकारे यांच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.

राज्यात भेसळयुक्त पदार्थ तपासण्यासाठी सध्या असलेल्या प्रयोगशाळा कमी पडत असल्यामुळे खासगी सहभागातून अशा प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी माहिती अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्माराव अत्राम यांनी दिली. यासंदर्भात या खात्याला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल तसंच सरकार याबाबत कडक भूमिका घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत दिली.

****

 

 

छत्रपती संभाजीनगर इथं किलेअर्क परिसरातल्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचा मुद्दा विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी तरतूद केलेली असून, हे काम जलद पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं.

आमदार राजेश राठोड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोलार पॅनल न बसवता, देयकं अदा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्रकरणी आठ दिवसांत तपास करून कारवाईचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.

****

राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यासाठी पन्नास हजार युवकांची, योजना दूत, म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

****

अतिवृष्टीमुळे गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्याने मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...