Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याबरोबरच अन्य समाजघटकांवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅब वर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची मंत्री उदय सामंत यांची घोषणा
· वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक
· हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार - वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ
आणि
· मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात २८ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस
****
पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे अशी भुमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद इथं ११ जणांचं पथक पाठवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातले इतर सदस्य, खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.
****
विनियोजन विधेयकाला काल विधीमंडळाने संमत केलं. आधी विधानसभेनं आणि त्यानंतर विधान परिषदेनं या विधेयकाला मंजुरी दिली. त्यापूर्वी महसूल, वने, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य तसंच महिला बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या.
दरम्यान, ९४ हजार ८८९ कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या सरकारनं काल सादर केल्या. त्यातली सर्वाधिक २५ हजार कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केली आहे. नगर विकास विभागासाठी १४ हजार ५९५ कोटी, तर कृषी विभागासाठी १० हजार ७२४ कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे.
या पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे सरकारने स्पष्ट करण्याची मागणी, काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्यांना विरोध दर्शवत, महसुली तूट एक लाख १४ हजार कोटींच्या पलीकडे गेल्याचं सांगितलं, तर राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये याची खबरदारी घेऊनंच या पुरवणी मागण्या सादर केल्याचा निर्वाळा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला.
विधान परिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. या अतिरिक्त अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅब वर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा, मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली. या कायद्यात दर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी तसंच फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल, असं त्यांनी सांगितलं. कायदा अस्तित्वात येईपर्यंत राज्यभर जिल्हावार पथकं तयार करून पॅथॉलोजी लॅब ची तपासणी केली जाईल, तसंच कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिली.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या गुरुवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. लोकशाहीची मूल्ये आणि नैतिकता वृद्धींगत करण्यासंदर्भात ते दोन्ही सदनांच्या सदस्यांसमोर विचार मांडणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला शहापूरमधून काल अटक करण्यात आली. शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असलेल्या मिहीरने, शनिवारी रात्री उशीरा मद्यप्राशन करून वाहन चालवत असतांना, वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला धडक दिली, त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मिहीर फरार होता. मिहीरची आई तसंच बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आलं असून, अपघातापूर्वी मिहीरने जूहू इथं मद्यप्राशन केलेल्या बारला उत्पादन शुल्क विभागानं सील ठोकलं आहे.
****
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयात अध्यापकांची पदं भरण्याची कार्यवाही राज्य लोकसेवा आयोगामार्फत सुरु असून, वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातली कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
****
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी, काल उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, विविध समस्यांविषयी चर्चा केली. परिसरातल्या गावकऱ्यांना कोणत्याही समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि अंतिम निर्णय होईपर्यंत याबाबत कार्यवाही करू नये, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात काल लातूर इथं शांतता रॅली काढण्यात आली. यानंतर झालेल्या सभेत जरांगे यांनी, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आज धाराशिव इथं शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १३ आणि १४ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपुरवठा, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्याचं नियोजन तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन या विषयावरच्या यशकथांचं सादरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या ३० वर्षासाठी शहराच्या पाणीपुरवठ्याची काय व्यवस्था राहणार आहे यावर चर्चा केली जाईल.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन, इंडिया टुरिजम आणि औरंगाबाद टुरिजम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने, काल चालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पर्यटकांना सेवा देणाऱ्या शंभर चालकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
****
नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातला तिसरा संशयित आरोपी गंगाधर याला लातूर न्यायालयानं उद्यापर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या पथकानं त्याला आंध्र प्रदेशातून अटक केली.
****
बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधांची पाच कोटी पाच लाख ७१ हजार रुपयांची १९ कामं मंजूर करण्यात आली आहेत. ही कामं पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली. बच्चू कडू यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
****
शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या उळेगाव इथं स्वागत करण्यात आलं. ही पालखी आज सोलापूरमार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
****
ग्रामीण भागातल्या कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सात ऑगस्ट पर्यंत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी ही माहिती दिली. प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग, 'ओला हिरवा'-'सुका निळा' या नावाने अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वच्छतेचे दोन रंग अभियानाची जालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या परिसरातला आणि घरातला ओला, सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करावा, असं आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये चेन्नई इथं काल झालेल्या तिसर्या टी - ट्वेंटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेलं ८५ धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी ११व्या षटकात पूर्ण केलं. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीचा जून महिन्यातला सर्वोत्तम खेळाडू जाहीर केलं आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी स्पर्धेत बुमराहनं ८ सामन्यांमध्ये १५ बळी टिपले होते. महिला क्रिकेट खेळाडू स्मृती मंधाना हिला देखील जून महिन्यातली सर्वोत्तम खेळाडू जाहीर केलं आहे.
****
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात २८ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ पूर्णांक एक मिलीमिटर पावसची नोंद झाली. बीड जिल्ह्यातल्या पाच महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यातल्या अंमळनेर महसूल मंडळात झाला. लातूर जिल्ह्यातल्या पानचिंचोली मंडळात ९० मिलिमीटर, धाराशिव जिल्ह्यात मोहा इथं ६१ मिलिमीटर, पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातल्या प्रमुख १२ प्रकल्पांत १३ पूर्णांक ८० टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसात अहमदनगर मार्गावर कडा इथला पूल वाहून गेला. कडी नदीवर पुलाचं बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी हा पुल तात्पुरता बांधण्यात आला होता. या मार्गावरुन वाहतुकीसाठी पर्याय मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment