Wednesday, 10 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 10.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१० जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा या गावात आहे. नांदेड शहरात सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.

हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या भागात पहाटे भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे हादरे बसले. परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असून, कुठेही नुकसान झालेलं नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, असं आवाहन नांदेड आणि हिंगोली जिल्हा प्रशासनांनी केलं आहे. गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते त्यांनी त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी  अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

अतिवृष्टीमुळे गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्याने मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई - मडगाव वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेस, तसंच मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन नक्षलवाद्यांना भामरागड तालुक्यातल्या धोडराज परिसरातून पोलिसांनी अटक केली. रवी मुल्ला पल्लो आणि दोबा कोरके वड्डे अशी या दोघांची नावं असून, त्यांच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं.

****

मुंबईत दलित पँथर संघटनेचा ५२ वा वर्धापन दिन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या अफवा विरोधी पक्षांनी पसरवल्या, मात्र संविधान कधीही बदललं जाणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशा काल ही घोषणा केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...