Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा उपस्थित केला. राज्य क्षयमुक्त २०२५ साली होऊ शकतं का, तसंच या रोगाचं मूळ कारण काय, याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं ही मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितलं. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ही समिती मुंबईत विशेष अभ्यास करून आपला अहवाल देईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.
****
राज्यातल्या अंगणवाड्या उभारणी तसंच दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदनात दिली. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जात आहेत अशी माहिती मंत्री तटकरे यांनी यावेळी दिली.
****
मुंबईत इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता, उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते.
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्याने तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज विधान परिषदेत आमदार विजय गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते. या स्मारकासाठी मागच्या सरकारने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही, मात्र हे सरकार याबाबत समिती नेमणार असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर या स्मारकाची उभारणी करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील, असं सामंत यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत एक लाख ७३ हजार २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ११ हजार ७८८ ग्राहकांनी सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित बसवली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जगभरात वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे येणारी आव्हानं आणि संधी याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत १९८९ पासून दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.
****
जम्मू इथल्या भगवती आधार शिबीरातून ४ हजार ८८५ भाविक आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. यापैकी १ हजार ८९४ यात्रेकरु बालतलकडे तर २ हजार ९९१ यात्रेकरु पहलगाम इथल्या आधार शिबीरस्थळाकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणांहून हे यात्रेकरु आता पवित्र गुहेच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकन उपग्रहांच्या माहितीच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. समुद्राखालचा हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे. २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर असून सेतूचा सुमारे शंभर टक्के भाग उथळ पाण्याखाली आहे. त्यामुळे जहाजांद्वारे त्याचं सर्वेक्षण करणं शक्य नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड शहरात आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा इथून ही रॅली निघणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं हिमरु शाल निर्मितीचं प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत तसंच मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त करुन देऊ, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. ते यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महिलांनी या उद्योग उभारणीसाठी पुढे यावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे.
****
टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि इक्वाडोर चा जोडीदार गोंजालो एस्कोबार यांनी जर्मनीच्या ब्रौंश्वीग इथे ब्रावो खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या डबल्स उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
****
No comments:
Post a Comment