Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 11 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ११ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी राकेश रंजन याला अटक-१०दिवसांची
सीबीआय कोठडी
·
विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्ष सोहळ्यात उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांचं संबोधन
·
उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
·
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात
बीड इथं शांतता फेरी
आणि
·
छत्रपती संभाजीनगर इथल्या पेट्रोलियम डीलर्स संघटनेचं
१५ जुलैपासून मूक निषेध आंदोलन
****
नीट पेपरफुटी
प्रकरणातला मुख्य आरोपी राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने
आज अटक केली. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयाने
त्याला १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.
दरम्यान, वैद्यकीय
अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं
१८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. या प्रकरणी केंद्र सरकार तसंच राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं
दाखल केलेल्या शपथपत्रांवर याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडता यावी, यासाठी
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज हे स्थगिती आदेश दिले.
दरम्यान, नीट यूजी
परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने आतापर्यंत झालेल्या तपासाचा
अहवाल आज सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या उल्लेखाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण नव्हे, रिता असल्याचे
गौरवोद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढले आहेत. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी
वर्षात ते आज राज्य विधीमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते. देशाला नवीन उंचीवर
नेण्यासाठी महाराष्ट्र भक्कम योगदान देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.
राज्यपाल
रमेश बैस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान
सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह
दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही सदनांचे विरोधी पक्षनेते तसंच दोन्ही सदनांचे सदस्य
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
विधान
परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी
१२ उमेदवार रिंगणात आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं
आवश्यक आहे. उद्या सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान हे मतदान होणार असून, उद्याच
सायंकाळी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय
फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव
गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून
प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापाचे जयंत पाटील, ही निवडणूक
लढवत आहेत.
****
राज्य
सरकारने मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली. त्यावर
उत्तर देतांना, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसल्याचं
सांगत, राज्यात मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिल्याकडे लक्ष वेधलं. आमदार यशोमती
ठाकूर यांनी विदर्भात कोळी तसंच धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
****
अंमली
पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत या वर्षी मे महिन्यापर्यंत राज्यात ६ हजार ५२९ कारवाया
करण्यात आल्या असून यात ४ हजार १३१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्र
खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं, तर नगररचना
सुधारणा विधेयक सदनासमोर सादर करण्यात आलं.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या १९ जुलै पासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली
जातील. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
ही वाघनखं ३ वर्ष राज्यात राहणार आहेत. या वाघ नखांसाठी कुठलंही भाडे
दिलेले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात इतर अनेक वाघनखं असली तरी त्यांच्याबाबत
ती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा दावा कुणीही केलेला नाही असं ते म्हणाले.
****
अहमदनगर
इथल्या दूध आंदोलनासंदर्भात मंत्रालयस्तरीय तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध
उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे समन्वयक
डॉ अजित नवले यांनी ही माहिती दिली. समितीच्या वतीने पाच जणांचं शिष्टमंडळ या बैठकीसाठी
पाठवण्यात आलं होतं. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव तसंच ऊसाप्रमाणे रास्त आणि किफायतशीर
दर लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर
जिल्ह्यातल्या ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे उर्वरित १ हजार १२९ कोटी
३७ लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून
ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.
****
विधानसभेच्या
आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या २२५ जागा निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातील
उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज मुंबईत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश
केला, त्यावेळी पवार बोलत होते. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी
या सगळ्यांना सोबत घेऊन, आपलं राज्य प्रगत करण्याचा मानस शरद पवार यांनी यावेळी
बोलतांना व्यक्त केला.
****
बीड इथं
आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण जनजागृती
शांतता फेरी आणि जनसंवाद सभा झाली. मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेल्या या
फेरीत सकल मराठा भजन पथकाच्या सहभागाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज
चौकात जनसंवाद सभा घेऊन समारोप करण्यात आला.
****
संपूर्ण
देशात जातनिहाय जनगणना करा तसंच नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणाची ५०% मर्यादा हटवण्याच्या
मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पुढच्या गुरुवारी १८ जुलैला देशव्यापी आंदोलनाचा
इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर १८ तारखेला सकाळी ११ वाजता निदर्शनं करण्यात येणार असल्याचं, भाकपच्या
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या विविध मागण्यांसाठी येत्या १५ जुलैपासून
मूक निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अकील अब्बास यांनी आज पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. इंधन कंपन्यांनी गेल्या सात वर्षात पंप धारकांच्या कमिशनमध्ये
वाढ केलेली नाही, त्यामुळे आता पंपचालकांना पंप चालवणं कठीण झाल्याची भावना
अब्बास यांनी व्यक्त केली. कमीशन वाढ, इंधनात इथेनॉलच्या वापराबाबत
जनजागृती, आणि इतर मागण्यासाठी येत्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान हे आंदोलन केलं जाणार
आहे. मात्र या आंदोलनाची झळ वाहन धारकांना बसणार नसल्याची ग्वाही अब्बास यांनी दिली.
****
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या दोन जहाल नक्षलवादी महिलांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. प्रमिला
सुखराम बोगा उर्फ मंजुबाई आणि अखिला संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती अशी या दोघींची
नावं आहेत. दोघींवर शासनाने प्रत्येकी आठ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं.
****
नांदेड
इथले सीमा सुरक्षा दल - बीएसएफमध्ये कार्यरत असलेले हुतात्मा कामेश विठ्ठलराव कदम यांच्या
पार्थिव देहावर आज नांदेड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा सुरक्षा
दलाचे कॅप्टन राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून
हुतात्मा कदम यांना सलामी दिली. तहसीलदार संजय वरकड यांनीही यावेळी पुष्पचक्र अर्पण
केलं. हुतात्मा कामेश कदम यांना ९ जुलै रोजी हरियाणातल्या गुडगाव इथं वीरमरण आलं होतं.
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ - एसटी च्या वतीने लातूर विभागात प्रवासी राजा आणि कामगार पालक
दिनाला १५ जुलैपासून सुरुवात होणार आहे. सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी आणि राज्य परिवहन
कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटीच्या विभाग नियंत्रकांनी केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचे ऑफलाइन
आणि ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी
अधिकारी मीनल करणवाल यांनी कासारखेडा इथं आकस्मित भेट देत या मोहिमेची पाहणी केली.
****
No comments:
Post a Comment