Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला आज संबोधित करणार
· पर्यावरण संवर्धनात महाराष्ट्राची आघाडी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याला १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार
· मुस्लीम महिलांनाही पोटगीचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
· छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी महिनाभरात कार्यादेश-उद्योगमंत्री उदय सामंत
आणि
· भारताची झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत २-१ ने आघाडी
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
****
महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचं जनक राज्य आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. १५व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्रयांनी काल दिल्ली इथं स्वीकारला, त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्य सरकारनं २१ लाख हेक्टरवर झाडं लावण्याचा आणि पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. सरकारनं बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या देशातल्या पहिल्या मायक्रो मिलेट क्लस्टर प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बांबू विषयी राज्य सरकारकडून हाती घेतलेल्या उपायांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रशंसा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं अर्थतज्ज्ञांसमवेत चर्चा करणार आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात पंतप्रधान तज्ज्ञांचे विचार जाणून घेणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेश २२ तारखेला सुरु होत आहे. २३ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर करणार आहेत.
****
मुस्लिम महिलांनाही पतींकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं काल एका सुनावणी दरम्यान, घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यास विरोध करणारी एक याचिका फेटाळून लावतांना ही बाब स्पष्ट केली. मुस्लिम महिला अधिनियम १९८६, हा धर्मनिरपेक्ष कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं.
****
मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गदारोळ झाल्याने विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज काल तहकूब करण्यात आलं. विधानसभेत या मुद्यावरून सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली.
दरम्यान, गदारोळ वाढत गेल्यानं, सदनाचं कामकाज सकाळच्या सत्रात चार वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गदारोळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केल्या आणि कोणत्याही चर्चेविना त्या मंजूर करण्यात आल्या. याशिवाय, कर विषयक कायदे सुधारणा विधेयक, महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध विधेयक आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध करणारं विधेयक, ही तीन विधेयकं विधानसभेनं मंजूर केली.
विधान परिषदेतही सदर बैठकीला विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून गदारोळ झाला. त्यानंतर उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनमतानं दिवसभराचं कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
****
दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते.
राज्यातील कायमस्वरूपी विनाअनुदानित, दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतीगृहं, कार्यशाळा तसंच अनाथ-मतिमंदांची बालगृहं यांना अनुदान देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.
****
राज्यातल्या मोठ्या शहरांमधल्या शासकीय रुग्णालयांमधल्या, विविध आजारांची तपासणी करणाऱ्या यंत्रणा तसंच जनरेटरची व्यवस्था अशा बाबींचा आढावा घेण्यात येईल आणि त्यात काही त्रुटी आढळल्या तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य रमेश कोरगावकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेमध्ये अटींचा समावेश करण्यात आला आहे. यानूसार पात्र ठरलेल्या निविदांचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, असं मंत्री सामंत यांनी सांगितलं.
****
राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात चार टक्के वाढ केली असून आता महागाई भत्ता पन्नास टक्के इतका झाला आहे. हा निर्णय या वर्षीच्या एक जानेवारीपासून लागू होणार आहे. महागाई भत्त्यातली ही वाढ निवृत्तीवेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनाही लागू होणार आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात काल सकाळी झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत याबाबत माहिती दिली. या भूकंपामुळे कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर तसंच वाशीम या जिल्ह्यांमध्ये काल सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड शहरातही काल सकाळी भूकंपाचे हादरे बसले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं किलेअर्क परिसरातल्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचा मुद्दा विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी तरतूद केलेली असून, हे काम जलद पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं. आमदार राजेश राठोड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोलार पॅनल न बसवता, देयकं अदा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्रकरणी आठ दिवसांत तपास करून कारवाईचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या वसतीगृहामधली सुरक्षा, पाणी पुरवठा, भोजनाची गुणवत्ता आदी समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं.
****
वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचं झालेलं नुकसान कधीही भरून येणारं नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंढरपूर इथल्या पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवांच्या सेवे साठी सज्ज राहण्याच्या सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी काल संबंधितांना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असं सांगत त्यांनी हिरकणी कक्ष तसंच वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास संयुक्तीक भेटी देऊन पाहणी केली.
****
सीमा सुरक्षा दलात नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांना हरियाणात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं परवा वीरमरण आलं. कदम हे नांदेडचे रहिवासी होते. नांदेड इथे आज त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
भारत आणि झिम्ब्वाब्वे संघात टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताने २३ धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांचा मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली आहे. काल हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेला यजमान संघ निर्धारित षटकांत सहा बाद १५९ धावाच करू शकला. मालिकेतला चौथा सामना येत्या शनिवारी खेळवला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment