Friday, 12 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 12.07.2024 रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 July 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजेपासून मतदान सुरू झालं आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेचे आमदार त्यासाठी मतदान करणार आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापचे जयंत पाटील, ही निवडणूक लढवत आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मत मिळवणं आवश्यक आहे. दुपारी ४ पर्यंत मतदान होणार असून त्यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

****

राज्यातील विविध घटकांना शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी नॉन क्रिमीलेयरची आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे, ही मर्यादा वाढविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.याबाबतची लक्षवेधी सूचना संजय गायकवाड, नितीन राऊत आणि इतरांनी उपस्थित केली होती.

****

अमरनाथ यात्रेत आज ४ हजार ४३४ भाविकांचा जत्था, जम्मूच्या भगवती नगर इथल्या शिबीरातून पवित्र गुहेकडे रवाना झाला. १६५ वाहनांमधून हे भाविक निघाले आहेत. यापैकी एक हजार ७२१ यात्रेकरू बालताल बेस कॅम्पमार्गे तर दोन हजार ७१३ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पमार्फत अमरनाथ गुहेकडे प्रस्थान करणार आहेत.

****

नेपाळमध्ये आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास दोन बस त्रिशुली नदीमध्ये कोसळल्या. बसमध्ये चालकासह ६५ प्रवासी होते. यापैकी वीरगंजहून काठमांडूला जाणाऱ्या बसमध्ये ७ भारतीयांसह २४ प्रवासी होते तर काठमांडूहून रौतहटला जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये ४१ प्रवासी होते. सकाळपासून बचाव आणि शोधमोहिम सुरु आहे, मात्र अद्यापही मुसळधार पाऊस सुरु असल्याने बचाव कार्यात अडथळा येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

यावर्षी डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काल नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. केंद्र सर्व राज्यांकडील उडीद, तूर आणि मसूर डाळीच्या १०० टक्के खरेदीसाठी वचनबद्ध असल्याचं शिवराज सिंह म्हणाले.

****

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी काळा पैसा वैध करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ईडीनं केलेल्या अटकेच्या विरोधातील केजरीवाल यांची याचिका वरच्या पीठाकडं सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. दरम्यान, मद्यधोरण प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपात केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत.

****

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज लेखणी बंद आंदोलन केलं जात आहे. नांदेड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असल्याचं राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी सांगितलं. विविध १३ प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा येवते यांनी दिला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर आणि निराधार यांचा मशाल मोर्चा काढण्यात आला. निराधारांना मासिक तीन हजार रुपये मानधन वाढ, सोयाबीनला दहा हजार रूपये भाव द्यावा,गतवर्षीचा पीकविमा द्यावा, शेतीकर्ज पूर्ण मुक्त करा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज जालना शहरातून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघणाऱ्या या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव दाखल झाले आहेत.

****

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत, त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये २०० हून अधिक सदनिका आहेत त्यांनी मतदान केंद्र स्थापन करण्याबाबतचा आपला प्रस्ताव उद्यापर्यंत पाठवावा अशा सूचना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...