Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी समन्वयानं काम कराव-उपराष्ट्रपती जगदीप धनखड
· विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान, सायंकाळी होणार मतमोजणी
· नीट प्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी, समुपदेशन प्रक्रियेला या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार सुरुवात
· केंद्रीय दलांच्या भरती प्रकियेत माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
आणि
· संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन
****
लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी परस्परांमध्ये संवाद ठेवून समन्वयानं काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात ते काल राज्य विधीमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते. संसद तसंच विधीमंडळात सर्वपक्षीयांमध्ये संवादाची आवश्यकता व्यक्त करत, गदारोळाच्या प्रयत्नांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका, शिस्तीचं पालन करणाऱ्यांना अधिकाधिक संधी द्या असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा दाखला त्यांनी दिला. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्र भक्कम योगदान देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.
****
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे. रिक्त जागांपेक्षा एक उमेदवार अधिक असल्यानं, या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून, आज सायंकाळी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापचे जयंत पाटील, ही निवडणूक लढवत आहेत.
****
केंद्रीय दलांच्या भरती प्रकियेत माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलात माजी अग्निवीरासांठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवेशासाठी वयाची अटही शिथिल करण्यात आली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं १८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली. तसंच नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं अटक केली आहे. तर, या प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी एन.गंगाधरन याच्या कोठडीत काल न्यायालयानं चार दिवसांची वाढ केली. सीबीआय कोठडीत गंगाधरन याच्या मोबाईल मधून 'नीट' प्रकरणी तब्बल ६०० जणांसोबत संपर्क झाल्याची माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली.
****
२०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ही समिती मुंबईत विशेष अभ्यास करून आपला अहवाल देईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.
****
राज्यातल्या अंगणवाड्या उभारणी तसंच दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदनात दिली. राज्यातील सर्व अंगणवाडया स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जात आहेत अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.
****
मुंबईत इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता, उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते.
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्याने तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधान परिषदेत आमदार विजय गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या १९ जुलै पासून साताऱ्यातल्या सरकारी संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ही वाघनखं ३ वर्ष राज्यात राहणार आहेत. या वाघ नखांसाठी कुठलंही भाडं दिलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात इतर अनेक वाघनखं असली तरी त्यांच्याबाबत ती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा दावा कुणीही केलेला नाही असं ते म्हणाले.
****
अहमदनगर इथल्या दूध आंदोलनासंदर्भात मंत्रालयस्तरीय तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे समन्वयक डॉ अजित नवले यांनी ही माहिती दिली. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव तसंच ऊसाप्रमाणे रास्त आणि किफायतशीर दर लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या ११ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे उर्वरित १ हजार १२९ कोटी ३७ लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.
****
बीड इथं काल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण जनजागृती शांतता फेरी आणि जनसंवाद सभा घेण्यात आली. मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी बीड जिल्ह्यातून करत असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दरम्यान, जरांगे यांच्या नेतृत्त्वात आज जालना शहरातून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे.
****
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. आज पालखी नातेपुते मुक्कामाहून पुढे मार्गस्थ होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल. त्यानंतर पालखी अकलूजमध्ये प्रवेश करेल. याठिकाणी आज तिसरं गोल रिंगण होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या विविध मागण्यांसाठी येत्या १५ जुलैपासून मूक निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अकील अब्बास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कमीशन वाढ, इंधनात इथेनॉलच्या वापराबाबत जनजागृती, आणि इतर मागण्यासाठी येत्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान हे आंदोलन केलं जाणार आहे. मात्र या आंदोलनाची झळ वाहन धारकांना बसणार नसल्याची ग्वाही अब्बास यांनी दिली.
****
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विविध पदांची सेवा ज्येष्ठता यादी तसंच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. यासह इतर मागण्यांचं निवेदन बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. या मागण्यांवर विचार न झाल्यास, २२ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात काल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला प्रभारी प्राचार्य चक्रपाणि गोमारे यांनी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. यानिमित्तानं सहावी ते आठवी या वर्गासाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कळमनुरी आणि वसमत उपजिल्हा रुग्णालयात तसंच आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात विशेष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरं घेण्यात आली. या शिबिरात २६ स्त्रियांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांचे ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कासारखेडा इथं आकस्मित भेट देत या मोहिमेची पाहणी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात नोंदणी अभियानाला सुरूवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या योजनेची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहनांवर भोंगे लावून, माहिती पत्रक वाटून प्रचार करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment