Saturday, 13 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 13.07.2024 रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 July 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातील सात राज्यांमध्ये विधानसभेच्या रिक्त झालेल्या १३ जागांसाठी १० जुलै रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या सर्व जागांवरील मतमोजणी आज सकाळपासून करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांचा त्यात समावेश आहे. या तिन्ही जागांवर राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ११ ऑगस्टला मतदान होणार असून, १२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाकडून जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील रिक्त ११ जागांसाठी याच दिवशी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

****

मुंबई उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक सखल भागातील रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यामुळं वाहतुक मंदावली असल्याचं वृत्त आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यानं नद्यांच्या पातळीत घट होत आहे. पंचगंगेसह सर्वच नद्यांचं पाणी पात्रात गेलं असून पाण्याखाली गेलेले बंधारे आता रिकामे होऊ लागले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे.

****

 

छत्रपती सभाजीनगरात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आज निघणाऱ्या शांतता रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातल्या सिडको भागातील वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर रॅली निघणार आहे. त्यासाठी रस्त्याच्‍या दुतर्फा रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना पाण्यासह इतर प्रकारच्या मदत वाटपाचे स्‍टॉल लावण्यात आले आहेत.

दरम्यान, शांतता रॅलीमुळं डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं मानधन तत्वावर प्राध्यापकांच्या नेमणूकीसाठी आयोजित केलेली टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आज ऐवजी उद्या घेतली जाणार असल्याचं कळवलं आहे.

****

कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण आणि शास्वत विकास टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भेटीदरम्यान दिलं आहे. पटेल यांनी कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी आकडेवारीनिशी मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या आहेत.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस. टी. चे विभाग नियंत्रक सकाळच्या सत्रात प्रवाशांच्या तर दुपारच्या सत्रात कामगारांच्या लेखी तक्रारी स्वीकारणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी या उपक्रमाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू अध्यक्ष तथा अखिल भारतीय भिकू संघाचे अतिरिक्त सचिव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भदंत प्रा. डॉ. सुमेधबोधी महाथेरो यांचे दीर्घ आजारामुळे निधन झालं. यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी इंथल्या महाबोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सुमेधबोधी महाथेरो बौद्ध धम्मप्रचार आणि प्रसार करत होते. राज्यभरात त्यांचे हजारो अनुयायी होते.

****

शैक्षणिक संस्थांनी आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

****

अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये १ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येतो. मात्र हा दंड कमी असून यामध्ये आता अवैध वृक्षतोड रोखण्याण्यासाठी ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यासंदर्भात सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न मांडला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...