Saturday, 13 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:13.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी

·      िधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित-राज्याच्या प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा 

·      शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार

·      छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन

आणि

·      मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

****

विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ तर महाविकास आघाडीच्या तीन पैकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर परळी इथं, तर राजेश विटेकर यांच्या समर्थकांनी परभणी इथं विजयाचा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.

****

िधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. विधान परिषदेत या अधिवेशन काळात एकूण नऊ विधेयकं तर विधानसभेत एकूण दहा विधेयकं संमत झाली.

****

राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते काल विधानसभेत उत्तर देत होते. समाजाच्या प्रत्येक घटकांना लोकोपयोगी योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत, जनतेचं दुःख हलकं करू शकलो याचं समाधान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

विधान सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, विविध मुद्यांवरून सरकारवर टीका केली. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं असताना, नव्याने जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कुठून येणार, याचं समाधानकारक स्पष्टीकरण सरकारला देता आलेलं नाही, असं दानवे यांनी सांगितलं.

****

१५ वर्षांच्या आतील सर्व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभेत ही माहिती देण्यात आली.

****

राज्यातल्या शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. तांबे यांनी, कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

****

विकास प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील सुधारणा अथवा अंमलबजावणीबाबत सुलभता आणण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलत होते.

****

इतर मागास प्रवर्गातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १५ लाख रूपये करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली. वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवताना त्यामध्ये शेतीमधून मिळणारं उत्पन्न ग्राह्य धरू नये, अशी विनंती करण्यात येईल, असं सावे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटी परिसरात नियोजित एथर एनर्जी या इलेक्ट्रीक दुचाकी प्रकल्प उभारणीसाठी १०० एकर जमिनीचं वाटपपत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतंच प्रदान करण्यात आलं. या माध्यमातून  सुमारे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना गृह मंत्रालयानं काल जारी केली. आणिबाणी विरोधात लढा दिलेल्या नागरिकांच्या योगदानाचं, हा दिवस स्मरण करून देईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. ऐतिहासिक वास्तुंचा संरक्षित वास्तूंच्या यादीत समावेश करवून घेण्यात रफत कुरेशी यांचा सिंहाचा वाटा होता. कुरेशी यांच्या निधनानं समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

****

'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेची विभागात पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावडे केली.

या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात परवा ११ जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ७५ हजार ७०२ महिलांनी तर परभणी जिल्ह्यात १९ हजार ५३० महिलांनी अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यात 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं १५ ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज भरून घेण्यासाठी आज आणि उद्या विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिल्या आहेत.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, काल काल जालना शहरातून आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही रॅली जाहीर सभेत विसर्जित झाली.

****

गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशहितासाठी कार्य करावं, असं आवाहन  विद्याभारतीचे शेषाद्री डांगे यांनी केलं आहे. काल धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताची तरुण पिढी कुशल आणि आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

जालना जिल्ह्यात काल भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा  मृत्यू झाला, अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अवयव दानाबद्दल जनजागृती होण्याची गरज छत्रपती संभाजीनगर इथले डॉ अजित भागवत यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात नांदेड इथं मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयव दानातून छत्रपती संभाजीनगर इथं, खासगी रुग्णालयात एकाच दिवशी हृदय आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, त्या पार्श्वभूमीवर काल पत्रकार परिषदेत डॉ भागवत बोलत होते. अवयव प्रत्यारोपण केलेल्या या दोन्ही रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.   

****

महसूल कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता मंजूर करावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काल लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड इथले कर्मचारी यात सहभागी झाले.

****

नांदेड जिल्ह्यात विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी १ हजार २५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली.

****

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं नीरा स्नान सोहळा साजरा झाला. पालखीच्या रिंगण सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा काल माळशिरस तालुक्यात पुरंदरवडे इथं रिंगण सोहळा झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...