आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१३ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपुजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह महाविद्यालय आणि विद्यापीठात आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रॅलीसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं २० गुंठे शेतजमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी उत्तरवार असं या निबंधकाचं नाव आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज सायंकाळी गजल संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जीवन विकास ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गजल गायक भीमराव पांचाळे यांच्याशी रसिकांना थेट संवाद साधता येणार आहे.
****
नांदेड जिल्हा पोलीस भरती २०२२ -२३ या वर्षासाठीची शिपाई आणि बँडस्मन पदाची लेखी परीक्षा शनिवारी २० जुलै रोजी नांदेड इथल्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सकाळी आठ वाजता परीक्षेसाठी हजर राहण्याचं आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातला चौथा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज हरारे इथे होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतलेली आहे.
****
No comments:
Post a Comment