Monday, 15 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:15.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना, मुख्यमंत्र्यांनी घेतला आषाढी एकादशीच्या तयारीचा आढावा

·      कोकणासह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

·      भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत विजय

आणि

·      विम्बल्डन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझचे सलग दुसरे विजेतेपद

****

आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा परवा बुधवारी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर काल पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधांचा तसंच एकूणच यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी आषाढी एकादशीला पांडुरंगांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल, असं स्पष्ट केलं. सरकारनं वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचे मुख्यालय पंढरपूर येथेच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारनं वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये जाहीर केले होते, ते संबंधित दिंडीच्या बँक खात्यावर वितरीत झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही, असाचं निर्णय सरकार घेणार. सरकार वारकऱ्यांचं आहे, वारकरी आणि शेतकरी एक मोठा चमू आपण पाहतो इथं आणि त्यामुळे वारकरी, कष्टकरी, शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय. त्यामुळे या लोकांना, आपल्या वारकऱ्यांना पांडूरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य. गेल्या वर्षी जेव्हा पुजा चालु असतांना पांडुरंगाचं मुखदर्शन चालु ठेवलं होतं, ते सुरु असतांना दीड लाख लोकांनी दर्शन घेतलं. प्रशासनाला एवढचं त्यांना सांगितल आहे, वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये याची काळजी घ्या.’’

आपल्या या दौऱ्यात करकंब इथं मुख्यमंत्र्यांनी संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे तसंच गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची पालखी ७०० किलोमीटरचा प्रवास करत, काल पंढरपुरात दाखल झाली. मुक्ताईनगर इथून ३५ दिवसांचा प्रवास करून संत मुक्ताई यांची पालखीही काल पंढरपूर इथं दाखल झाली. ही पालखी बंधू भेटीसाठी १६ तारखेला वाखरी इथं जाऊन, पुन्हा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्कामी राहणार आहे.

****

दरम्यान, वाखरी इथं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी येण्याचा अंदाज शासनानं वर्तवला आहे. त्या अनुषंगानं साोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून वाखरी- टाकळी जवळ ५२ एकर परिसरात पालखीतळाची संकल्पना राबवण्यात येत आहे. या ठिकाणी २४ तास आयुर्वेदिक तेलाने पादाभ्यंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच मुक्कामी येणाऱ्या दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे.

****

राज्यातील धनगर आणि एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आगामी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भात मंजुरी देण्यात येईल असं अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानं, धनगर समाजानं येत्या आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यासह प्रदक्षिणा घालण्याचे आंदोलन स्थगित केलं. यासोबतचं पंढरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा आणि निधी तर शहरात असणाऱ्या पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाला निधी उपलब्ध करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

****

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसह आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता १४ ॲागस्ट रोजी होणार आहे. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात दाखल याचिकेवर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.

****

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन किलो सोनं आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आत्तापर्यंत जवळपास ४०० ते ५०० जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत ३० जुलै पर्यंत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या याजनेचा लाभ मिळावा यासाठी ही मागणी केली असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. आज या योजनेची विमा भरण्याची मुदत संपणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उद्या मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे, सदनिका, निवासी भुखंडाचा यात समावेश आहे. फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीला अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. कोल्हापूर, पुणे, सातारा परिसरातही मुसळधार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. अंजनेरी इथं ट्रेकिंगदरम्यान अडकलेल्या दहा जणांना प्रशासनानं सुखरुप बाहेर काढलं. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री, अंबा, कुंडलिका, पातळगंगा नद्यानी इशारा पातळी ओलांडली आहे. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रत्नागिरी स्थानकात काल सायंकाळी पावणेसहापासून थांबवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

****

मराठवाड्यातही काल बहुतांश जिल्ह्यात पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि धाराशिव शहर आणि परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

दरम्यान, हवामान विभागानं आज रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, पुणे, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे. तर, सोलापूर, छत्रपती संभाजीगर, धाराशिव, नांदेड आणि बीड  जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे.

****

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका ४-१ नं जिकंली आहे. शेवटच्या सामन्यात भारतानं यजमान संघाचा ४२ धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत सहा बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ १९व्या षटकांत १२५ धावांवर सर्वबाद झाला. शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा ६-, -, -६ अशा फरकानं पराभव केला. अल्कराझचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात कालपर्यंत ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यात ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टर शेतजमिनीवर उभ्या पिकांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही, त्यांनी विमा काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यासंदर्भात शहरी तसंच ग्राम समित्यांनी शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या आहे.

बीड जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये जाऊन महिलांना या योजनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी गेल्या दोन दिवसात गेवराई, वडवणी, पाटोदा, अंबाजोगाई, आष्टी आणि केज या तालुक्यांना भेटी देऊन या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीणयोजनेसाठी गेल्या तीन दिवसात पाच हजार ४८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. काल रविवारी सुद्घा अर्ज स्वकारण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लातूर इथं माझं लातूर, हरित लातूरही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी काल शहरातहरितोत्सवउपक्रम घेण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...