Monday, 15 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 15.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१५ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय परीक्षा परिषद-एनटीएनं सामायिक विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा सीयुइटी युजी ही पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १९ जुलै रोजी संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल.

****

अमरनाथ इथल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी चार हजार ८७५ यात्रेकरुंचा जत्था जम्मुच्या भगवतीनगर आधार शिबीरातून रवाना झाला आहे. यातील काही जण बालतालसाठी तर काही पहलगामसाठी मार्गस्थ झाले आहेत.

****

धनगर समाजानं येत्या आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यासह प्रदक्षिणा घालण्याचं आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील धनगर आणि एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा काल केली. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यासंदर्भात मंजुरी देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानं, हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

****

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलै पर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली.

****

नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला असून ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यात शंभर टक्के पेरण्या झाल्या असून चांदवड, मालेगाव, निफाड, नांदगाव, देवळा आणि बागलाण या सहा तालुक्यांमध्ये ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

****

राज्यात रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक इथं काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि धाराशिव शहर आणि परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे या स्थानकादरम्यान दरड कोसळल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या रत्नागिरी स्थानकातच रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागानं आज रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, पुणे, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, सोलापूर, छत्रपती संभाजीगर, धाराशिव, नांदेड आणि बीड  जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...