Tuesday, 16 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 16 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १६ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

जम्मू काश्मिरमध्ये काल दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका सैन्य  अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आले. काल रात्री डोढा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने ही विशेष मोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले, या सर्वांना आज वीरमरण आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.

****

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त अन्न आणि औषध प्रशासनाने नागरिकांना भगर, साबुदाणा, आदी जिन्नसांची पाकीटबंद स्वरुपातच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. पावसाळ्यातली आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. सुट्या जिन्नसांना बुरशीचा प्रादूर्भाव होऊन विषबाधा होण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरीक, व्यवसायिक तसंच उपाहारगृह चालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून आतापर्यंत ५५ टक्क्यांहून अधिक नव्या सदस्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या सदस्यांमध्ये प्रथमच नोकरी करणाऱ्या युवा मनुष्यबळाचा मोठा समावेश आहे तसंच सदस्यांची वाढती संख्या हे औपचारिक रोजगारात वृद्धी झाल्याचं सूचित करतं असंही त्यांनी सांगितलं. कोविड - १९ दरम्यान केंद्र सरकारच्या आपत्कालीन कर्ज हमी योजनेअंतर्गत लघूउद्योगांना आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठी मदत झाल्याचंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं

****

वाशिमच्या वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या पालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीसांनी दिली आहे. स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना आवश्यक असलेलं वैद्यकीय तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं, मात्र त्यात कोणत्याही अपंगत्वाचा उल्लेख केलेला नव्हता, अशी माहिती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालयाचे संचालक अरविंद नवले यांनी दिली.

****

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. पवार यांचा राजकारणाबरोबरच समाजकारणातील अनुभव मोठा आहे त्यामुळे त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं अशी विनंती शरद पवारांना केल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.  दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आपण कोणतंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

****

ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात काल सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली. पाच जुलै रोजी सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत सदतीस हजार ७५४ झाडे लावण्यात आली आहेत.

****

मुंबई - पुणे द्रूतगती महामार्गावर खाजगी बस ट्रॅक्टरला धडकून झालेल्या भीषण अपघातात, पाच भाविकांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. लोणावळ्याजवळ मध्यरात्री हा अपघात झाला, आषाढी एकादशीनिमित्त ही बस पंढरपूरकडे जात होती, बसमधले सर्व प्रवाशी डोंबिवली इथले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

****

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या फेरीत भारताच्या सुमित नागलची लढत स्वीडनच्या एलियास यमरशी होणार आहे, तर पुरुष दुहेरीच्या लढतीत आज संध्याकाळी सुमित नागल आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी या जोडीचा सामना फ्रान्सच्या जोडीशी होईल. भारतीय टेनिसपटू सुमितनं या मोसमात हेलब्रॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजरसह दोन विजेतेपदं जिंकली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...