Tuesday, 16 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 16 July 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १६ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      देशात यंदाच्या खरीप हंगामात ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी

·      आषाढी वारीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शासकीय महापूजा

·      छत्रपती संभाजीनगर इथं म्हाडाची आज संगणकीय सोडत

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद

आणि

·      राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

 

सविस्तर बातम्या

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ६२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ४० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर एक कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी झाली आहे. या तिन्ही प्रकारांमधल्या पिकांच्या पेरणीचं क्षेत्रं गेल्यावर्षीपेक्षा वाढलं आहे.

****

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, तसंच लोकसभेचं कामकाज चालू असतांना प्रेक्षकदीर्घेतून दालनात उतरत, धुराचे डबे फोडले होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी भुजबळ यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

****

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्थांसाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे.

****

राज्यातल्या अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत ही सर्व रिक्त पदं भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा तसंच प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून, इच्छुक महिलांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. एक हजार ४९४ गाळे, सदनिका, निवासी भूखंडाचा यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास कार्यालयातल्या या योजनेच्या समन्वयक सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात उद्या बुधवारी प्रसारित केली जाणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. गावोगावी अर्ज भरून घेण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करू नये तसंच कोणी पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्राम पातळीवर ग्राम समिती आणि नगर पंचायत तसंच नगरपालिका पातळीवर वॉर्डसमिती नियुक्त केली असल्याची माहिती, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

****


या योजनेसाठी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आले असून, योजनेसाठी अर्ज छाननी आणि ऑनलाईन नोंदणीला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथल्या नियोजित औद्योगिक वसाहतीत १३० लघुउद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या औद्योगिक वसाहतीतून दहा हजार रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सहज साध्य होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

****

कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक, माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणं, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारं सर्व प्रकारचं साहित्य, कार्यालयीन उत्पादनं आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही.

****

ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने नरहर कुरुंदकर संशोधनवृत्ती देण्यात येते. यासाठी यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या अधिव्याख्याता डॉ. सुनीता सावरकर आणि छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीचे माजी उद्घोषक लक्ष्मीकांत धोंड यांची निवड करण्यात आली आहे. केंद्राचे संचालक डॉ. भगवान अंजनीकर यांनी काल ही माहिती दिली. 

****

देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून, राज्यात पुढील पाच दिवस किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. २० जिल्ह्यांमधल्या साडे आठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यातल्या बहुतांश भागात गेल्या ४८ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव ग्रामीण आणि पारगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

****

महसुली कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात लागू न करणं, यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे हिंगोली, परभणी तसंच बीड इथलं महसूल विभागाचं कामकाज प्रभावित झालं. छत्रपती संभाजीनगर इथंही महसूल विभागाचे बहुतांश कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

****

लातूर महानगरपालिकेच्या कर आकारणी तसंच कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५० दिवसातच तब्बल साडे दहा कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. मागील काही वर्षांच्या कर संकलनाच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीचं हे प्रमाण सर्वाधिक आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...