Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 July 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरी होत
आहे. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीस लागू दे, तसंच प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळू दे
अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केली आहे. आजच्या देवशयनी आषाढी
एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं
जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल
दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी १०३ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी
या महापूजेनंतर बोलताना केली -
तिरूपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन
पद्धत आपण करू या. याला लागणारे १०३ कोटी रूपये शासन तात्काळ देईल एवढी खात्री मी
आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या, महापुजेच्या खूप खूप
शुभेच्छा देतो.
****
शिर्डी इथं आज साईबाबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त उत्सव
साजरा करण्यात आला. यानिमित्तानं मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या
नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार
नवनाथ वगवाड यांच्या हस्ते आज महापूजा करण्यात आली.
प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी
स्वामी महाराज मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. ही पालखी नगर प्रदिक्षणा
घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज पहाटेपासूनच
भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या
गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून आहेत.
****
मुस्लिम धर्मियांमध्ये करबला युद्धातल्या बलिदानाचं स्मरण
करून देणारा मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम
हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ताजिया
मिरवणूक काढली जाते.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान
चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात
सादर करतील.
****
लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती
शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या एकोणीस तारखेला सातारा इथे पोहचणार आहेत. या ऐतिहासिक
घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. हा सोहळा अत्यंत दिमाखदार आणि
राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून, ती सकाळी दहा ते पाच या वेळेत नागरिकांना पाहता येतील.
****
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष
आबासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आदित्य यांचा काल एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. बारामती
तालुक्यात रुई लिम्टेक मार्गावर धावत्या कारचं टायर फुटून हा अपघात झाल्याचं वृत्त
आहे.
****
विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना
मतदान करणाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष श्रेठींकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय परवा
१९ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय
वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर इथं ही माहिती दिली.
****
पुण्यातल्या पिंपरी चिंचवड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे
काही नगरसेवक तसंच कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच
दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment