Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
· आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी-पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
· राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
· मुस्लिम धर्मियांच्या मोहर्रम निमित्त ताजियांच्या मिरवणुकांमध्ये भाविकांचा लक्षणीय सहभाग
आणि
· सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
****
आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपुरात आरोग्य शिबीरं भरवण्यात आली असून, सुमारे ८ लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आणखी सात लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी‘ पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देहूच्या श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडीला एक लाखाचा प्रथम पुरस्कार तर पुण्याच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दानेवाला निकम दिंडीला ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंढरपुरातल्या भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं ५ कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचं स्वागत असल्याचं सांगत, वकिलांनाही असं विद्यावेतन देण्याची मागणी केली. राज्यात योग्य गुंतवणूक आणून युवकांना खात्रीशीर रोजगार मिळवून द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
आषाढीचा सोहळा आज राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. शिर्डी इथं आज साईबाबा मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळी सुरू झालेली आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.
आषाढी एकादशीच्या दिंडीच्या औचित्यानं परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून आज वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते, या दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा सजीव देखावा करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजाननमहाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बाकीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
****
भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं “ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स” या छायाचित्र प्रदर्शनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. मुंबईत दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अटल सेतूचा संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दररोज दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात वडलापेठ इथल्या प्रस्तावित भव्य पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे साडेतीनशे एकर जागेवर हा दहा हजार कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारणार आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.
****
मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण आज भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर आणि पोफळी परिसराला आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली, या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावाजवळ होता.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या प्रचारासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष शिबीर लावून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी वारी असल्यामुळे महावितरणच्या या कँपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment