Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 July 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी
मिळणारा प्रतिसाद आनंददायी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या सामाजिक संपर्क
माध्यमावर आज याबाबत लिहिलेल्या लेखात त्यांनी ही भावना व्यक्त केली. येत्या २८ जुलै
रोजी या मालिकेतला पुढचा भाग प्रसारित होणार असून, या कार्यक्रमासाठी अनेक नागरिकांनी आपले सल्ले आणि विचार पाठवत असल्याचं मोदी यांनी या लेखात म्हटलं
आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या सूचना माय गोव्ह
तसंच नमो ॲपवर पाठवावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. छत्रपती
शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचं प्रतिक असलेली वाघनखं विशेष सुरक्षेत
साताऱ्यात आणण्यात आली आहेत, त्याच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांचा आजचा हा दौरा असून, त्यांच्या दौऱ्यात शिव शस्त्र शौर्य गाथा दालनाचं उद्घाटन
होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित राहणार
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
ही वाघनखं उद्यापासून सामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत.
****
काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक सुरु
आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.
****
शेती मालाप्रमाणेच दुधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबत
केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा, अशी मागणी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी केली आहे. या संदर्भात नुकतंच त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना
पत्र लिहिलं असून, राज्यातील दूध व्यवसायाची
सद्य परिस्थिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या
आणि राज्य सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची या पत्रातून माहिती दिली आहे. दूध
उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघाकडून मिळणारा खरेदी दर अत्यंत कमी असून, ही परिस्थिती लक्षात घेवून राज्यातील महायुती सरकारने
प्रतिलिटर ३० रुपये देण्याची दूध संघांना केलेली सूचना तसंच प्रतिलीटर ५ रुपये अनुदानही
देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहितीही या पत्रातून दिली आहे.
****
रायगड जिल्ह्यात पेण इथल्या जगविख्यात गणेशमूर्तींना भारत
सरकारकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते
हे मानांकन पत्र पेणच्या मूर्तीकारांकडे सूपूर्द करण्यात आलं. भौगोलिक मानांकन प्राप्त
झाल्याने पेणच्या गणपतींना स्वतःची अधिकृत ओळख प्राप्त झाली असून, यापुढे पेणच्या गणपतीच्या नावाने बनावट मूर्ती तयार करून
होणारी फसवणूक थांबणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या
योजनेला वेग आला असून या योजनेची जिल्हा प्रशासनामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू
आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने ७७ हजार ४०८
अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३४
हजार ६५ पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून गावात दवंडी
देण्याबाबत निर्देश देण्यात आले असून, शिबिरांचं देखील आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पात्र
महिलांनी आपले अर्ज ग्रामपंचायतीत आणि इतर संबंधित केंद्रावर भरावेत, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप
शेंगुलवार यांनी केलं आहे.
****
दरम्यान, या योजनेअंतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५४ हजार ४८९
महिलांनी नोंदणी केली आहे.
****
महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून
श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत
होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
हवामान
येत्या पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, आणि कर्नाटकच्या किनारपट्टी आणि अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी
जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज आणि उद्या २० जुलै रोजी आंध्रप्रदेशचा
किनारपट्टी भाग आणि तेलंगणात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment