Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 19 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १९ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
शिवचरित्राच्या प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य-वाघनखांच्या
अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही-काँग्रेस सरचिटणीस
के सी वेणुगोपाल यांचा इशारा
·
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरविरोधात
यूपीएससीकडून गुन्हा दाखल
·
छत्रपती संभाजीनगरात फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी
वनविभागाची १६ पथकं तैनात
आणि
·
महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ;आज भारत-पाक
सामना
****
शिवचरित्राच्या
प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केलं आहे. सातारा इथल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात लंडनहून आणलेल्या वाघनखांचं
अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, या वाघनखांची
पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या वाघनखांचं दर्शन हे एकप्रकारचं शिवदर्शनच ठरेल, अशी भावना
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले-
बलाढ्य शत्रूला चितपट करून भारताच्या इतिहासात पट बदलणारी ही वाघनखं आहेत.
आणि म्हणून ही वाघनखं नुसती धातुची नाहीयेत. ती शिवरायांच्या युद्धनीतीचा हुंकार होता.
अफजलखानाच्या वधामुळे तर ते पराक्रमाचं प्रतीक ठरलंय. हा शिवकालीन इतिहास याचा साक्षीदार
असलेल्या गोष्टीचं जतन हे आपलं कर्तव्य आहे.
ही वाघनखं
पुढील सात महिने साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात पाहता येणार आहेत. दरम्यान, शिवशस्त्र
शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रतापगड
प्राधिकरण स्थापनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. खासदार उदयनराजे भोसले
हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, यासाठी दीडशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, याबाबतचा
शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री
शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पक्षात
बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस
के सी वेणुगोपाल यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली, त्यानंतर
ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षादेश झुगारून इतर उमेदवारांना
मतदान केलं, त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत त्याची माहिती मिळेल, असं वेणुगोपाल
म्हणाले. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असून, आघाडीतले
प्रमुख तीन पक्ष एकत्र बसून जागावाटपाची चर्चा करणार असल्याचं, वेणुगोपाल
यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातलं
सरकार डबल नाही, तर ट्रबल इंजिनचं सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यातल्या महायुती सरकारच्या कार्यकाळावर
आधारित, 'महायुतीचे काळे कारनामे' या पुस्तिकेचं पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी
ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून १५ ऑगस्टपर्यंत
'माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र' ही मोहीम राबवण्यात येणार असून, यात मिळणाऱ्या
प्रतिसादानुसार आपण आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करू, असं पाटील
यांनी सांगितलं.
****
भारतीय
जनता पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत मित्रपक्षांबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली
नसल्याची माहिती, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिली आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत
होते. कालच्या बैठकीबाबत माध्यमांमधून अनेक चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्याचं
बावनकुळे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप जवळपास ९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र
तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, असं बावनकुळे
म्हणाले.
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या १९३ स्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या
माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, राज्याचे
उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी
तालुक्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या
एसटी बसस्थानकाचं लोकार्पण सामंत यांच्या हस्ते झालं, त्या वेळी
ते बोलत होते. बसस्थानकं, स्वच्छतागृहं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असून, सर्वांनी
त्याचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल
तपासणीत, पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी
आणि ईमेल तसंच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. या गैरवर्तनाबद्दल
त्यांची उमेदवारी रद्द का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीसही आयोगानं खेडकर यांना बजावली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी
पूजा खेडकर यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावत उद्या २० जुलैला हजर राहण्यास सांगितलं आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेडकर यांनी छळाचे आरोप केले होते, त्यासंदर्भातला
जबाब नोंदवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
****
मायक्रोसॉफ्ट
क्लाऊड सेवा बंद पडल्याने, देशांतर्गत विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरी
उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. या अडचणीमुळे विमानांना
सरासरी ५१ मिनिटं उशीर होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज तीनही सैन्यदलाचे अधिकारी तसंच सैनिकांना तसंच निमलष्करी दलाच्या सैनिकांना शौर्यपदकं देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये परमविशिष्ट सेवा पदक तसंच अतिविशिष्ट सेवा पदकं, आदी ९४ पदकांचा समावेश होता.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रम मालिकेचा तिसऱ्या टप्प्यातला
दुसरा भाग, येत्या २८ जुलै रोजी प्रसारित होणार आहे, या कार्यक्रमासाठी
मिळणारा प्रतिसाद आनंददायी असल्याचं, पंतप्रधानांनी आज सामाजिक
संपर्क माध्यमावर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगरात मागील काही दिवसांपासून फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची १६
पथकं सज्ज आहेत, विभागीय वनाधिकारी सूर्यकांत मंकावार यांनी ही माहिती दिली आहे. ते आज आकाशवाणीच्या
प्रतिनिधीशी बोलत होते. नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, शक्यतो
रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळावं, लवकरच या बिबट्याला पकडण्यात येईल, असं मंकावार
यांनी सांगितलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजूर झालेल्या सुमारे ८
हजार ४२६ विविध घरकुल लाभार्थांनी पहिला हप्ता मिळूनही घरकुल बांधकाम सुरु न केल्याचं
आढळून आलं आहे. अशा लाभार्थांनी ३१ जुलैपर्यंत बांधकाम सुरु करावेत अन्यथा संबंधित
लाभार्थ्यांना वितरित केलेल्या हप्त्याची रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार असल्याची
माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेतून ५५ हजार ९६३ लाभार्थ्यांना
घरकुल मंजूर करण्यात आलं असून, यापैकी ५० हजार ६३८ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता
वर्ग करण्यात आल्याची माहिती खांडेकर यांनी दिली.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या विशाळगड परिसरातल्या गाजापूर इथं मशीद, दर्गा
आणि मुस्लीम वस्तीवर हल्ला प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी
छत्रपती संभाजीनगर इथं आज माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निदर्शनं
करण्यात आली. आपल्या मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना सादर करण्यात
आलं.
दरम्यान, बीड शहरातही
आज एमआयएम पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ
निलंबित करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.
****
महिलांच्या
टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरुवात होत
आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार
संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
मुंबई
उपनगरात नागरिकांचं जीवनमान उंचावणं आणि झोपडपट्टी भागातील सुधारणांसाठी जिल्हा वार्षिक
योजनेत एक हजार १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment