Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 July
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· नीट-यूजी परीक्षेचा उद्यापर्यंत
केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय चाचणी संस्थेला आदेश
· मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजनेच्या महास्वयम् संकेतस्थळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
· जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक
करणाऱ्या खासगी जीपचा अपघात, सात जणांचा मृत्यू
आणि
· महिला टी-ट्वेन्टी आशियाई
क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान लढत, तर पुरुष क्रिकेट संघाची श्रीलंका दौऱ्यासाठी घोषणा
सविस्तर बातम्या
नीट
युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल, उद्या शनिवारी दुपारी १२
वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला
दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज
मिश्रा यांच्या पीठासमोर कालपासून सुरु झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. एनटीएनं शहर
आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह, परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दडवता आपल्या
संकेतस्थळावर निकाल जाहीर करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल काल बंद लिफाफ्यातून
न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची
शक्यता असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अशा परीक्षेतल्या गैरप्रकारांचे गंभीर सामाजिक
दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. पुढची सुनावणी येत्या
सोमवारी होणार आहे.
दरम्यान, नीट यूजी पेपर फुटीप्रकरणी
सीबाआयनं बिहारची राजधानी पाटणा इथल्या एम्स महाविद्यालयातल्या चार विद्यार्थ्यांना
ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरु आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत नक्षली चळवळीतल्या
दोन दलमचा बिमोड झाल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी काल
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले, त्या सर्वांवर मिळून ३०
लाख रुपयांचं बक्षीस होतं.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये विजापूर आणि
सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विशेष
कार्यदलाचे दोन पोलिस हुतात्मा झाले तर चार पोलिस जखमी झाले.
****
मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या महास्वयंम या संकेतस्थळाचं अनावरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते काल झालं. यावेळी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
या पोर्टलवर उमेदवार, उद्योग व्यावसायिक तसंच
आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेत नोंदणी करतांना, अर्ज भरण्यासाठी महिलांकडे पैशांची मागणी करण्याऱ्यांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. फक्त शासकीय केंद्रांवर
भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील, तसंच महिलांचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक
भरण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
****
राज्याचं
पर्यटन धोरण - २०२४ तयार करण्यात आलं आहे. या धोरणाद्वारे राज्यात अंदाजे एक लाख कोटींची
गुंतवणूक होणं अपेक्षित असून, १८ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं, पर्यटन मंत्री गिरीश महाजन
यांनी सांगितलं. ग्रामीण तसंच शहरी भागात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, तसंच येत्या दहा वर्षात
पर्यटनस्थळं आणि पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करणं, हे या धोरणाचं उद्दिष्ट
आहे.
****
कष्टकरी, शेतकरी, निराधार, दिव्यांग यांच्या हक्कासाठी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं येत्या नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चाचा इशारा देण्यात
आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी काल छत्रपती
संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक
ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे. आपल्या मागण्या सरकारने मान्य
केल्या, तर
येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने प्रचार करू, अन्यथा विरोधात प्रचार करण्याची
भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली.
****
मराठा
आरक्षण आंदोलनासंदर्भात येत्या सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण जनजागृती
शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जालना
जिल्ह्यात आंतरवाली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या जनजागृती रॅलीची सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातून होणार असून, १३ ऑगस्टला नाशिक इथं समारोप होणार आहे.
दरम्यान, उद्या २० जुलैपासून पुन्हा
आमरण उपोषणाचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं
दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत.
****
जालना
जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा
मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना
इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ
खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, त्यानंतर ही जीप रस्त्यालगतच्या
विहिरीत पडून हा अपघात झाला.
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून या अपघाताची
माहिती घेतली. मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी
जाहीर केली आहे.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून, धाराशिव जिल्ह्यातली कोणतीही पात्र महिला, वंचित राहणार नाही याची
दक्षता घेऊन नियोजन करण्याचे निर्देश, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्ह्यात
आतापर्यंत या योजनेसाठी ८९ हजार ३१९ महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली.
लातूर
जिल्ह्यातल्या उदगीर इथं नगरपालिकेकडून घरोघरी जावून महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम
राबवला जात आहे. यासाठी १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
आतापर्यंत दोन लाख ५४ हजार ४८९ महिलांची नोंदणी झाली आहे.
****
महिलांच्या
टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरुवात होत
आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार
संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं
श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी पुरुष क्रिकेट संघ जाहीर केला.
सूर्यकुमार यादव टी-२० कर्णधार असणार आहे. एकदिवसीय संघात कर्णधार रोहित आणि विराट
कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही मालिकांसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधारपद
सोपवण्यात आलं आहे. २७ जुलै रोजी पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.
****
नशा
मुक्ती भारत अभियानाअंतर्गत काल धाराशिव जिल्ह्यात पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात
सर्व विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य के.
वाय. इंगळे, यांच्यासह
सर्व शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
कौशल्य
शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी स्कील्स ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत़ लेंड अ हॅन्ड
या संस्थेच्या वतीनं भारतभर परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या
परिक्रमेचं आगमन झालं असून, जिल्ह्यातल्या १० शाळांना ही परिक्रमा भेट देणार आहे.
****
बीड
जिल्ह्यात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करावी, या मागणीसाठी काल जिल्हा
परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं, या मागणीचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
संपूर्ण
देशभरात जातनिहाय जनगणना करावी, तसंच आरक्षणाची ५० टक्के कमाल मर्यादा हटवावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट
पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे शहर सचिव अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना
सादर करण्यात आलं.
****
अंबाजोगाई
इथं योगेश्वरी देवीच्या मंदिरात उभारण्यात आलेल्या प्रसादालयाचं काल उद्घाटन करण्यात
आलं. या प्रसादालयात दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ
मिळणार आहे.
****
बीड
जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवलं
जाणार आहे. २२ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हे अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे उपायुक्त एस आर मकरंद यांनी दिली.
****
आगामी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी
प्रसिद्ध होणार आहे. या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी तसंच नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये बदल, नाव वगळणी करण्याची संधी
मतदारांना २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल.
****
No comments:
Post a Comment