Friday, 19 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१९ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून, त्याच्यासह अर्थविषयक विधेयकाचा यामध्ये समावेश आहे. २२ तारखेला संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार असून, ते १२ ऑगस्टपर्यंत चालेल.

****

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार ५०० बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं, नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी काल नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्स - वैश्विक मूल्य साखळीत भारताची भागीदारी हा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं विशेष सुरक्षेत साताऱ्यात आणण्यात आली आहेत. त्याच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आज साताऱ्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शिव शस्त्र शौर्य गाथा दालनाचं उद्घाटन होणार आहे. ही वाघनखं उद्यापासून सामान्य नागरिकांना पाहायला मिळतील.

****

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

रायगड जिल्ह्यात पेण इथल्या जगविख्यात गणेशमूर्तींना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हे मानांकन पत्र पेणच्या मूर्तीकारांकडे सूपूर्द करण्यात आलं. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने पेणच्या गणपतींना स्वतःची अधिकृत ओळख प्राप्त झाली असून, यापुढे पेणच्या गणपतीच्या नावाने बनावट मूर्ती तयार करून होणारी फसवणूक थांबणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...