Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date:
20 July 2024
Time:
18.10 to 18.20 PM
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक:
२० जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
ठळक
बातम्या
·
जागतिक
वारसा समितीच्या ४६ व्या अधिवेशनाला उद्यापासून नवी दिल्लीत आयोजन
·
वैद्यकीय
पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट-यूजीच्या निकालाची केंद्रनिहाय यादी जाहीर
·
मराठा
आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात
आणि
·
विदर्भाच्या
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
सविस्तर
बातम्या
जागतिक
वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होणार
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. या अधिवेशनाच्या
माध्यमातून भारताचा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल, असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंह
शेखावत यांनी म्हटलं आहे. जागतिक वारसा समितीवर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे, अजिंठा वेरुळच्या लेण्यांसह देशातल्या एकूण ४२ वारसा स्थळांचा
जागतिक वारसा यादीत समावेश आहे.
****
राष्ट्रीय
परीक्षा परिषद-एनटीएने, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’
परीक्षेच्या निकालाची केंद्रनिहाय यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सर्वोच्च
न्यायालयानं एनटीएला आज दुपारी १२ वाजेपर्यंत शहर आणि केंद्रनिहाय निकालाची माहिती
संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश दिले होते.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोग-यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. सोनी यांचा
कार्यकाळ २०२९ मध्ये पूर्ण होणार होता, मात्र वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी
सांगितलं. २०१७ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य असलेले सोनी यांनी १६ मे २०२३
रोजी आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
होता.
****
मुंबईला
अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा
डाव असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. धारावीच्या पुनर्वसन
प्रकल्पाबद्दल बोलातांना, धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी,
तसंच नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा
प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.
काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही धारावी पुनर्वसन मुद्यावरून सरकारवर टीका केली, या प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट
केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही या मुद्द्यावर भूमिका जाहीर
केलेली असल्याचं, पटोले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी
समुद्रातलं नियोजित स्मारक न उभारता, छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून नकली वाघनखं आणल्याचा
आरोपही पटोले यांनी सरकारवर केला.
****
महाराष्ट्राची
सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असून आम्हाला राज्याला
स्थिर सरकार द्यायचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुतारी
वाजवणारा माणूस हे चिन्ह यापुढे पक्षासाठी सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील, मात्र हा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय फक्त राज्यापुरता
लागू असून लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी देखील हाच निर्णय लागू करायला हवं, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षण
आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या
गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी
संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी,
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तसंच तीनही गॅझेट लागू करावे या मागणीचा त्यांनी पुनरुउच्चार
केला. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यानं पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचं जरांगे पाटील
म्हणाले. सरकारच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण या योजनांवरही जरांगे यांनी टीका केली. सध्या
शेत कामांचे दिवस असल्यानं कुणीही आंतरवालीकडे येऊ नये,
असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे.
दरम्यान, सरकारने परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना
मोफत शिक्षण दिल्याच्या निर्णयाचे जरांगे यांनी स्वागत केलं आहे.
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला परवा सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं
उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी २३ तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात
येईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे.
****
मायक्रोसॉफ्ट
कंपनीच्या सॉफ्टवेअर बिघाडामुळे विस्कळीत झालेली विमानसेवा आता पूर्वपदावर आली आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. काल झालेला हा बिघाड कंपनीकडून
दुरुस्त केला जात असून, या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून विमान वाहतुकीवर लक्ष
ठेवलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंसक आंदोलनांच्या
पार्श्वभूमीवर बांग्लादेशात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर
बांग्लादेशात शिकणारे ७७८ भारतीय विद्यार्थी समुद्री मार्गाने तर २०० विद्यार्थी हवाईमार्गाने
भारतात परतले आहेत.
****
विदर्भाच्या
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सलग
दोन दिवसापासून सर्वत्र पावसाची संतधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद
झाले आहेत. नागभीड तालुक्यात बोथली इथले दोन जण नाल्याच्या पुरात वाहून गेले, यापैकी एकाचा मृतदेह आढळला,
तर दुसऱ्याचा तपास सुरू आहे.
गडचिरोली
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, २७ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस
तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्हाधिकारी
संजय दैने यांनी काही पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
गडचिरोली
तालुक्यातील पोटेगाव नजीकच्या कुंभी नाल्याच्या काठावर अडकलेल्या काही शेतकऱ्यांची, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने बोटीच्या सहाय्याने
सुटका केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भंडारा
जिल्ह्यात आज सकाळी २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही
गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.दरम्यान, नागपूर रायपूर महामार्गावर दरड कोसळल्याने तासभर मोठी वाहतूक
कोंडी झाली होती, आता दरड हटवून वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.
दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २७ दरवाजे उघडण्यात आले असून, तीन ३ हजार ३३ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे. विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावकऱ्यांना
सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
****
विदर्भ
तसंच मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात २१ ते २३ जुलै दरम्यान विभागात हलक्या ते मध्यम
पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान केंद्राने वर्तवली आहे.
****
शेतकऱ्यांना
पिस्तुल दाखवून धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत
दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खेडकर यांना पुणे पोलिसांनी महाडमधून परवा ताब्यात
घेतलं होतं, त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंत, त्यांना आज पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आलं असता, त्यांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा पोलिसांनी अवैधरित्या,
पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या
तरुणास अटक केली आहे. मयूर भरेकर असं या तरुणाचं नाव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे. आज तो जळगाव इथून छत्रपती संभाजीनगरकडे
खाजगी वाहनाने येत असतांना, अजिंठा पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल एका तरुणाची गोळी झाडून हत्या
केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमांतर्गत मोफत प्रवेश
प्रक्रियेला येत्या सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात २६१ इंग्रजी शाळांमध्ये
२ हजार ६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी ३५ हजार अर्ज प्राप्त
झाले आहेत.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात १ लाख ४३ हजार २५१ महिलांचे अर्ज प्राप्त
झाले आहेत. या अर्जांपैकी ५९ हजार ९९४ अर्जांना ग्रामीण भागातील तालुका समितीने मान्यता
दिली आहे.
****
बीड लोकसभा
मतदारसंघातल्या मतदान केंद्रांमध्ये ७३ मतदार केंद्रांनी वाढ होणार आहे. या मतदार संघातल्या
मतदान केंद्रांची संख्या आता दोन हजार ४१६ होणार आहे,
यापूर्वी ही संख्या दोन हजार ३४४
इतकी होती.
****
लातूर शहरात
संशयीत डेंग्यू रुग्ण संख्येमध्ये गेल्या महिन्यापासून वाढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर
सर्वांनी आपली घरं, वसतीगृहं, शाळा, आदी याठिकाणी डास अळी निर्मुलन करावं, तसंच डास उत्पत्ती होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं
केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात
संततधार पावसामुळे शेतपिकांची चांगली वाढ झाली आहे. रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा
निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रीलंकेतल्या
दांबुला इथं सुरू असलेल्या महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत, आज थायलंड संघानं मलेशिया संघावर २२ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment