Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 July
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शिवचरित्राच्या प्रत्येक पानात
भविष्य घडवण्याचं सामर्थ्य-वाघनखांच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· विधानसभेच्या आगामी निवडणुकीत
महायुती तसंच महाविकास आघाडी कायम
· वादग्रस्त प्रशिक्षणार्थी
प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरविरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल
· मराठा आरक्षण आंदोलन नेते
मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण
आणि
· टी- ट्वेंटी महिला क्रिकेट
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी
सविस्तर बातम्या
शिवचरित्राच्या
प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केलं आहे. सातारा इथल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात लंडनहून आणलेल्या वाघनखांचं
काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं, या वाघनखांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या
वाघनखांचं दर्शन हे एकप्रकारचं शिवदर्शनच ठरेल, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले..
Byte…
ही
वाघनखं पुढील सात महिने साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात पाहता येणार आहेत, दरम्यान, शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते काल करण्यात आलं. प्रतापगड प्राधिकरण स्थापनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केली. खासदार उदयनराजे भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, या प्राधिकरणासाठी दीडशे
कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली.
****
विधानसभेच्या
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी तसंच महायुती कायम राहणार आहे. काल या संबंधित नेत्यांकडून
या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
विधानभेची
निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सांगितलं. काल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत
त्यांनी ही बाब स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी जवळपास
९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र
तसेच मंडल स्तरावर संघटना मजबूत करायला प्राधान्य देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
****
काँग्रेस
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस
के सी वेणुगोपाल यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते.
विधान परिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षादेश झुगारून इतर उमेदवारांना मतदान केलं, त्यांच्यावर पक्षाने कारवाई
केली असून काही दिवसांत त्याची माहिती मिळेल, असं वेणुगोपाल म्हणाले. आगामी निवडणुका महाविकास
आघाडी एकत्र लढणार असल्याचं, वेणुगोपाल यांनी सांगितलं.
प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी काल यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना, विधानसभेच्या जागा वाटपाची
चर्चा अद्याप सुरु झालेली नसून, घटक पक्षांसोबत बैठक घेऊन ही चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल
तपासणीत, पूजा
खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी आणि ईमेल तसच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची
फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. या गैरवर्तनाबद्दल त्यांची उमेदवारी रद्द का करु
नये, अशी
कारणे दाखवा नोटीसही आयोगानं खेडकर यांना बजावली आहे.
****
मायक्रोसॉफ्ट
क्लाऊड सेवेतल्या बिघाडामागचं कारण सापडलं आहे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
सामाजिक संपर्क माध्यमावर ही माहिती दिली. या समस्येचं निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू
असल्याचं, कंपनीकडून
सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या बिघाडाचा देशांतर्गत
विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही
माहिती दिली. मुंबई विमानतळावर विमानांना सरासरी ५१ मिनिटं उशीर होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातला
दुसरा भाग, येत्या
२८ जुलै रोजी प्रसारित होणार आहे, या कार्यक्रमासाठी मिळणारा प्रतिसाद आनंददायी असल्याचं, पंतप्रधानांनी काल सामाजिक
संपर्क माध्यमावर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा
दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलंही आश्वासन
पाळलं नाही, त्यामुळे
पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगरात मागील काही दिवसांपासून फिरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची १६
पथकं सज्ज आहेत, विभागीय वनाधिकारी अधिकारी सूर्यकांत मंकावार यांनी ही
माहिती दिली आहे. ते काल आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलत होते. नागरिकांनी घाबरण्याची
आवश्यकता नाही, शक्यतो
रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळावं, लवकरच या बिबट्याला पकडण्यात येईल, असं मंकावार यांनी सांगितलं
आहे.
****
अहमदनगर
जिल्हयात संगमनेर इथं दोन गर्भवतींना झिका संसर्ग झाला आहे. दरम्यान, संगमनेर शहरात प्रतिबंधात्मक
उपाय आणि सर्वेक्षण चालू असून आढळून येणाऱ्या रुग्णांची योग्य ती तपासणी आणि औषधोपचार
करण्यात येत आहेत, अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
****
महिलांच्या
टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं
पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय
संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा
सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.
****
परभणी
जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेकडून मंजूर झालेल्या सुमारे ८ हजार ४२६ विविध घरकुल
लाभार्थांनी पहिला हप्ता मिळूनही घरकुल बांधकाम सुरु न केल्याचं आढळून आलं आहे. अशा
लाभार्थ्यांनी ३१ जुलै पर्यंत बांधकामं सुरु करावीत अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना वितरित
केलेल्या हप्त्याची रक्कम शासनाकडे जमा करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर
यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात या योजनेतून ५५ हजार ९६३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर
करण्यात आलं असून, यापैकी ५० हजार ६३८ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता
वर्ग करण्यात आला आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात तुळजापूर इथं विनापरवाना उत्पादित केलेल्या डीएपी खताचा साठा, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी
काल जप्त केला. सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या ५९८ गोण्या आणि वाहन जप्त करण्यात आलं
असून, वाहन
चालक, वाहन
मालक तसंच खत उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
बीड
इथे काल जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, जन शिक्षण संस्थान आणि कौशल्य
विकास आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात
आला.
****
लातूर
शहरातले अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स तसंच होर्डींग्ज विरोधात कारवाई सुरु आहे. विना
परवानगी असे फलक लावणाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात येईल असा इशारा लातूर महापालिकेनं
दिला आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या विशाळगड परिसरातल्या गजापूर इथं मशीद, दर्गा आणि मुस्लीम वस्तीवर हल्ला प्रकरणी कडक कायदेशीर
कारवाई करावी, या
मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात
निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान, बीड शहरातही काल एमआयएम
पक्षाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित
करावं, अशी
मागणी आंदोलकांनी केली.
****
मराठवाड्यात
नांदेडसह लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये
मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment