Saturday, 20 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२० जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मायक्रोसॉफ्ट विंडोजला ऑनलाइन सायबर सुरक्षा सेवा देणाऱ्या क्राउडस्ट्राइक या प्लॅटफॉर्मच्या अपडेटमध्ये काल झालेला बिघाड आता दुरुस्त झाला आहे. हा बिघाड झाल्यामुळे काल दिवसभर जगभरातले बहुतांश संगणक, लॅपटॉप बंद झाले होते. याचा देशांतर्गत विमानसेवा, रेल्वे वाहतूक, बँकांचे व्यवहार, आयटी कंपन्यांच्या कामावर मोठा परिणाम झाला होता.

***

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा नोटिस बजावत आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केले होते. त्यासंदर्भातला जबाब नोंदवण्यासाठी ही नोटिस असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

परभणी जिल्ह्यात या आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर शेंडे आणि पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करतांना अंगावर औषध पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि तोंडावर मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

***

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक योजनेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी, अशी सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह विविध योजनांचा त्यांनी काल आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, लेक लाडकी आणि मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी  आवश्यक असणारं बचत खातं जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येणार आहे. परभणीचे डाक अधीक्षक मोहमद कदीर यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत आपल्या गावातील पोस्ट कार्यालयात बचत खातं काढण्याचं आवाहन कदीर यांनी केलं आहे.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...