Sunday, 21 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 21.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 July 2024

Time: 18.10 to 18.20 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

ठळक बातम्या 

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात, सरकारने आज बोलावलेल्या सवर्वपक्षीय बैठकीत केलं सहकार्याचं आवाहन

·      राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येईल - पक्षाच्या महाअधिवेशनात ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास

·      मुंबईसह विदर्भ, कोकणात आजही मुसळधार पाऊस

·      गुरुपौर्णिमा राज्यभरात उत्साहात साजरी, विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय

 

सविस्तर बातम्या

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल मांडतील. परवा मंगळवारी २०२४-२५ वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन, सरकारतर्फे या बैठकीत करण्यात आलं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, चिराग पासवान, रामदास आठवले, काँग्रेस नेते जयराम रमेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित होते.

****

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजता अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे.

****

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर, आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर परवा २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे.

****

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत, भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात, ते आज बोलत होते. या देशाची महान रचना केवळ भाजपचं करू शकतो, तसंच मागील दहा वर्षांत केंद्रातल्या भाजप सरकारनं आरक्षणाला बळकटी दिली असल्याचं शहा यावेळी म्हणाले. विरोधकांनी आरक्षणाबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. या अधिवेशनात पाच हजारांवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, लोकसभा निवडणुकीत, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने उपस्थित केलेल्या संविधान, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवरील खोट्या कथनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहात का, याचं उत्तर देण्याचं धाडस करावं, असं आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिलं.

****

उत्तराखंडमधल्या पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.

****

मुंबईसह विदर्भ, कोकणात आजही सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

नवी मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला असून, संततधार सुरु आहे. दुपारपर्यंत या भागात ९१ पूर्णांक ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बेलापूर इथल्या आर्टिस्ट व्हिलेजच्या मागे असलेल्या डोंगरावर अडकलेल्या ६० हून अधिक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तर नेरूळ एमआयडीसी इथं अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

ठाणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडला. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.

यवतमाळ जिल्ह्यात २४ महसूल मंडळांमध्ये आज सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे मारेगाव तालुक्यातला कोसारा सोईट मार्ग बंद झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याचं वृत्त आहे.


गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे ३१ मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गडचिरोली तालुक्यातल्या कोटगल बॅरेजच्या कामावरील ७० कामगारांना तर भामरागड इथल्या २५ दुकानदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिमुसळधार पाऊस पडत आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून, महाडमध्ये सावित्री आणि रोह्यात कुंडलिका नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढच्या २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला असून ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

 

दरम्यान, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, केंद्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

****

गुरुपौर्णिमा आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आज सकाळी शताब्दी ध्वजाचं पुजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव इथं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदीरात पहाटे पाच वाजता काकड आरती आणि अभिषेक करुन गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दर्शनासाठी भाविकांनी मंदीरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच शहरात गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं वृत्त आहे.

****

गुरु पौर्णिमेच्या दिवशी आज पंढरपूर इथं गोपाळकाल्यानं आषाढी वारीची सांगता झाली. सर्व संतांच्या पादुकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं.

****

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत, आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं झालेल्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रतम फलंदाजी करत भारतानं निर्धारित षटकांत पाच बाद २०१ धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं ६६, रिचा घोषनं नाबाद ६४, तर शेफाली वर्मानं ३७ धावा केल्या.  प्रत्यूत्तरादाखल, संयुक्त अरब अमिरातीचा संघ सात बाद १२३ धावाचं करु शकला. दिप्ती शर्मानं दोन, तर तनुजा कानवार आनि पूजा वस्त्राकरनं प्रत्येकी एक खेळाडू बाद केला. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या मंगळवारी नेपाळसोबत होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्र. ई. सोनकांबळे यांच्या जन्म दिनानिमित्त, आज प्र. ई. सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीनं, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. मराठवाड्यातल्या ग्रामीण साहित्याला एक नवीन दिशा देण्याचे कार्य सोनकांबळे यांच्या लिखाणाने केलं, असं मत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केलं. सोनकांबळे यांचं ‘आठवणींचे पक्षी’ हे आत्मचरित्र मराठवाड्यातलं पहिलं दलित आत्मचरित्र असल्याचं, त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या तीन विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आज या जनजागृती रथाचा शुभारंभ करण्यात आला. 

****

बीड जिल्ह्यात सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यात ४२६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण आज राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जिल्ह्यात बीड, परळी आणि माजलगाव शहरात हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, यासाठी एकूण १२ कोटी ९५ लाख रुपये इतका खर्च आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला जो भाग अपघात प्रवण क्षेत्रात असेल, त्या ठिकाणी देखील लवकरचं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी अपेक्षाही मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात आज नगरपरिषदेच्या वतीनं ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातले अनेक स्पर्धक यात सहभागी झाले होते.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...