Monday, 22 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, २०२३-२४ या गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सदनासमोर सादर केला. चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प त्या उद्या लोकसभेत सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.

दरम्यरन, हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातला हा अर्थसंकल्प, देशाच्या पुढच्या पाच वर्षांचं चित्र स्पष्ट करणारा असेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट यूजीमध्ये देशभरात सरसकट पेपरफुटी झाल्याचा विरोधकांचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावला. देशभरातल्या चार हजार सातशे परीक्षा केंद्रांपैकी फक्त पाटणातल्या एका केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याचं, प्रधान यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत, सरकारवर टीका केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडून तपास सुरू असल्याचं, प्रधान यांनी नमूद केलं.

****


शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं आजपासून २८ जुलैपर्यंत शिक्षण सप्ताह पाळला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत सादर केलेल्या प्रभावी शैक्षणिक सुधारणा आणि सहयोग यांना प्रोत्साहन देणं, हे या सप्ताहाचं उद्दीष्ट आहे. या कालावधीत, अध्यापन-शिक्षण साहित्य दिवस, पायाभूत साक्षरता, संख्याशास्त्र, क्रीडा दिवस आणि सांस्कृतिक दिवस साजरे केले जाणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून हा सप्ताह यशस्वी करण्याचं आवाहन शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केलं आहे. शैक्षणिक साहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टॉलचं प्रदर्शन या सप्ताहाअंतर्गत भरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओपारा गावातल्या तीनशे पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. या पुरात वाहून जाणाऱ्या एका युवकाला नागरिकांनी वाचवलं. सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागानं जिल्हात रेड अलर्ट जारी केला आहे

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

नागपूर शहरातही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसंच, नुकसानग्रस्त भागाला त्वरीत मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.

****

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून, ३३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या आज घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

मुंबई शहरासह उपनगरात आजही पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबलं असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवाही विस्कळीत झाली आहे.

****

नवी मुंबईत आज सकाळपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावं, तसंच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात मात्र आता पर्यँत २३१ मिलिमीटर पाऊस झाल्यानं, धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातल्या चांदवड, देवळा, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला आणि नांदगाव या सात तालुक्यांमध्ये १७४ गाव आणि ५६६ वाड्यांना १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या जिल्ह्यात २४ धरणांमध्ये सरासरी ४४ टक्के इतका पाणीसाठा आहे.

****

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...