Monday, 22 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 22.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ-अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक ठरण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त

·      गेल्या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर-जीडीपी वाढीचा दर सात टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

·      शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आणि

·      राज्यभरात पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफसह स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातला हा अर्थसंकल्प, देशाच्या पुढच्या पाच वर्षांचं चित्र स्पष्ट करणारा असेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प उद्या लोकसभेत सादर करणार आहेत.

दरम्यान, २०२३-२४ या गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सीतारामन यांनी आज सदनासमोर सादर केला. या अहवालात चालू आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन - जीडीपी वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेनंही चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर साडे चार टक्के आणि तर आगामी आर्थिक वर्षात हा दर ४ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट यूजीमध्ये देशभरात सरसकट पेपरफुटी झाल्याचा विरोधकांचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावला. देशभरातल्या चार हजार सातशे परीक्षा केंद्रांपैकी फक्त पाटणातल्या एका केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याचं, प्रधान यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत, सरकारवर टीका केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडून तपास सुरू असल्याचं, प्रधान यांनी नमूद केलं.

****

राज्य सरकारांना भांडवली खर्च तसंच गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्याची पुनर्गठन आणि विस्तारित योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्तीवेतनासंदर्भात आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं, चौधरी यांनी लोकसभेतच अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. जुनी निवृत्ती योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं चौधरी यांनी सांगितलं. खासदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. याला पर्याय म्हणून २०१९ मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून यात वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शनसह वृद्धावस्थेत सुरक्षेचा समावेश असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.

****

राज्यसभेचं कामकाज आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य काळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर १९६६ मध्ये ही बंदी लागू केली होती. ती मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्यापारी आणि खासगी बँका सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत असून, त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या बँकांवर कारवाई होणार नसेल, तर सरकारची आणि बँकांची मिलीभगत असल्याची शंका येते, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

****

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे, विरोधी पक्षांनी आपली भूमिकाही त्यावेळी स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आता सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असं पटोले यांनी नमूद केलं.

****

 

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. त्यांच्या घरातून पुणे पोलिसांनी पिस्तुल आणि काही काडतुसं जप्त केली आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र सध्या फक्त मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. इतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.

****

२०२४-२५ या वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आला आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणास मदत मिळणार आहे.

****

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह स्थानिक यंत्रणांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावं, पर्यायी निवारास्थानं, जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.

****

जळगाव जिल्ह्यात हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटर इतके उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात चार हजार २३८ दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी एकोणीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ३६१ पूर्णांक ८० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

****

शिर्डी इथं सुरु असलेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते.

****

नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर धाराशिव इथं उद्यापासून दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवीन पोलीस अधिक्षक कार्यालयात नियोजित या प्रदर्शनाचं उद्‌घाटन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणीसह विविध विषयांवर माहिती मांडण्यात येणार आहे. ही माहिती क्यू आर कोड स्कॅन करून मोबाईल वर मिळवण्याची सोयही करण्यात आली आहे. विधी अभ्यासक, पोलीस, वकील आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाला आज आठ दिवस पूर्ण झाले. या संपात जिल्ह्यातील ४३७ कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाने आपल्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली आहे.

****

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्यांना तीन वर्षाचा ग्रामपंचायत बैठक सदस्य भत्ता वितरित करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेला शासनाकडून तीन कोटी पाच लाख नव्वद हजार चारशे एवढी रक्कम प्राप्त झाली असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी सांगितलं.

****

लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत आणि हस्तांतरित भूखंड अधिकृत करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी वेळेत प्रस्‍ताव दाखल करून घेऊन भूखंड नियमित करण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय बाल स्वास्थ उपक्रमाची माहिती सर्वसामान्य जनतेने जाणून घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रायलायाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...