Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 July
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला
आजपासून सुरुवात
· युनेस्कोच्या जागतिक वारसा
केंद्रासाठी भारताकडून एक दशलक्ष डॉलर्सचं योगदान - पंतप्रधान मोदी यांची घोषणा
· मुंबईसह विदर्भ, कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई विमानतळावरुन ३६ उड्डाणं रद्द
आणि
·
आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाची आगेकूच, बीसीसीआयकडून ऑलिम्पिक खेळाडूंना साडेआठ कोटी रुपयांची
मदत जाहीर
सविस्तर बातम्या
संसदेचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
२०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल मांडतील. उद्या मंगळवारी २०२४-२५ वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प
लोकसभेत सादर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या
कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
सरकारने काल दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. काँग्रेसनं या अधिवेशनात नीट पेपरफुटी
प्रकरण, रेल्वे
सुरक्षा, अग्नीवीर
योजना, मणिपूर
आणि जम्मू-काश्मीर इथली कायदा-सुव्यवस्था या प्रकरणांवर चर्चा करण्याची मागणी केली.
****
जागतिक
वारसा जतन करणं ही भारत आपली जबाबदारी मानत असून, युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी एक दशलक्ष
डॉलर्सचं योगदान देण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जागतिक वारसा
समितीच्या ४६ व्या बैठकीचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
भारताचा वारसा केवळ इतिहास नाही, तर विज्ञानही आहे, भारताच्या हजारो वर्षांच्या परंपरांचा लाभ जगाला
झाला पाहिजे, असं
त्यांनी नमूद केलं. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को
जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ञ उपस्थित
होते. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवत आहे.
****
राज्यात
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर, आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर उद्या २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात
झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज
सादर करण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता
आहे.
****
राज्यात
आगामी विधानसभा निवडणुकीत, भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री आणि
भाजप नेते अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात आयोजित भारतीय जनता
पक्षाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात, ते काल बोलत होते. या देशाची महान रचना केवळ भाजपचं
करू शकतो, तसंच
गेल्या दहा वर्षांत केंद्रातल्या भाजप सरकारनं आरक्षणाला बळकटी दिली असल्याचं शहा यावेळी
म्हणाले. विरोधकांनी आरक्षणाबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पाच हजारांवर कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते.
दरम्यान, या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी, लोकसभा निवडणुकीत, काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं संविधान, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर
खोटा प्रचार केल्याचं सांगितलं. महाविकास आघाडी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण
देण्याच्या बाजूनं आहे का, असा
सवाल फडणवीस यांनी यावेळी केला.
****
केदारनाथ
पायी मार्गावर काल दरड कोसळल्यामुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर पाच भाविक जखमी झाले.
मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे. जालना
जिल्ह्यातले आणखी नऊ भाविक दुर्घटनाग्रस्त ठिकाणी असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात असल्याची
माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
गुरुपौर्णिमा
काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल सकाळी शताब्दी
ध्वजाचं पुजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, संत गजानन महाराजांच्या
दर्शनासाठी शेगाव इथं, तर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदीरातही भाविकांनी
मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या
वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच शहरात गारखेडा परिसरातल्या
गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.
गुरु
पौर्णिमेच्या दिवशी काल पंढरपूर इथं गोपाळकाल्यानं आषाढी वारीची सांगता झाली. सर्व
संतांच्या पादुकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं.
****
मुंबईसह
विदर्भ, कोकणात
कालही सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई
आणि उपनगरांत काल मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती, तर मुंबई विमानतळावरुन ३६
उड्डाणं रद्द करण्यात आली होती.
नवी
मुंबईत काल जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत या भागात ९१ पूर्णांक ११ मिलीमीटर पावसाची
नोंद झाली. बेलापूर इथल्या आर्टिस्ट व्हिलेजच्या मागे असलेल्या डोंगरावर अडकलेल्या
६० हून अधिक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, तर नेरूळ एमआयडीसी इथं अडकलेल्या एका नागरिकाला सुरक्षित
बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यातही काल
मुसळधार पाऊस पडला.
यवतमाळ
जिल्ह्यात २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात वर्धा नदीला आलेल्या
पुरामुळे मारेगाव तालुक्यातला कोसारा सोईट मार्ग बंद झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक
ठिकाणी शेतात पाणी शिरल्याचं वृत्त आहे.
गडचिरोली
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे ३१ मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गडचिरोली
तालुक्यातल्या कोटगल बॅरेजच्या कामावरील ७० कामगारांना तर भामरागड इथल्या २५ दुकानदारांना
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
रत्नागिरी
जिल्ह्यात काल अतिमुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत
असून, महाडमध्ये
सावित्री आणि रोह्यात कुंडलिका नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.
****
दरम्यान, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, केंद्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी
सतर्क रहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या
आहेत.
****
महिलांच्या
टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत, काल श्रीलंकेतल्या दांबुला इथं झालेल्या सामन्यात
भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं
निर्धारित षटकांत पाच बाद २०१ धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं ६६, रिचा घोषनं नाबाद ६४, तर शेफाली वर्मानं ३७ धावा
केल्या. प्रत्युत्तरादाखल, संयुक्त अरब अमिरातीचा संघ सात बाद १२३ धावाचं करु शकला.
दिप्ती शर्मानं दोन, तर तनुजा कानवार आनि पूजा वस्त्राकरनं प्रत्येकी एक खेळाडू
बाद केला. या विजयामुळे गुणतालिकेत चार गुणांसह भारत अग्रस्थानी असून,
अ
गटातला भारताचा शेवटचा सामना येत्या मंगळवारी नेपाळशी होणार आहे.
****
भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयं, भारतीय ऑलिम्पिक संघटनेला साडेआठ कोटी रुपयांची मदत जाहीर
केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीया यांनी आर्थिक सहकार्याबद्दल बीसीसीआयचे
आभार मानले आहेत. पॅरिसमध्ये २६ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावर्षी
११७ क्रीडापटू विविध क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं काल
वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी काढत जनजागृती करण्यात आली. यावेळी फुलं आणि पुस्तकांनी
सजवलेली पालखी, विद्यार्थ्यांनी
केलेली विविध प्रकारची पारंपरिक वेशभूषा, कलश, घोषणा फलक आणि लेझीमच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीनं
सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य
प्र. ई. सोनकांबळे यांच्या जन्म दिनानिमित्त, काल प्र. ई. सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीनं, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण
गायकवाड यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. मराठवाड्यातल्या ग्रामीण साहित्याला
एक नवीन दिशा देण्याचे कार्य सोनकांबळे यांच्या लिखाणाने केलं, असं मत गायकवाड यांनी यावेळी
व्यक्त केलं. सोनकांबळे यांचं ‘आठवणींचे पक्षी’ हे आत्मचरित्र मराठवाड्यातलं पहिलं
दलित आत्मचरित्र असल्याचं, त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणा-या तीन विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
****
जालना
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला
आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल या जनजागृती रथाचा शुभारंभ करण्यात
आला.
****
बीड
जिल्ह्यात सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यात ४२६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण काल राज्याचे
कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. सीसीटीव्ही
कॅमेऱ्यांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं. जिल्ह्यात बीड, परळी आणि माजलगाव शहरात हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, यासाठी एकूण १२ कोटी ९५
लाख रुपये इतका खर्च आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला जो भाग
अपघात प्रवण क्षेत्रात असेल, त्या ठिकाणी देखील लवकरचं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात
यावे, अशी
अपेक्षाही मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment