Tuesday, 23 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आज सादर करणार चालू वर्षासाठीचा अर्थसंकल्प

·      देशाच्या आर्थिक विकासाचा दर सहा पूर्णांक पाच ते सात टक्के राहण्याचा अंदाज, आर्थिक पाहणी अहवाल सादर

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० जुलै रोजी उदगीर दौऱ्यावर

·      मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

आणि

·      महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत-नेपाळ सामना

 

सविस्तर बातम्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज चालू आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. दरम्यान, २०२३-२४ या गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सीतारामन यांनी काल सदनासमोर सादर केला. या अहवालात चालू आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन - जीडीपी वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेनंही चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर साडे चार टक्के आणि तर आगामी आर्थिक वर्षात हा दर ४ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट यूजीमध्ये देशभरात सरसकट पेपरफुटी झाल्याचा विरोधकांचा आरोप, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावला आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. देशभरातल्या चार हजार सातशे परीक्षा केंद्रांपैकी फक्त पाटणातल्या एका केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याचं, प्रधान यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत, सरकारवर टीका केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडून तपास सुरू असल्याचं, प्रधान यांनी नमूद केलं.

****

राज्य सरकारांना भांडवली खर्च तसंच गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्याची पुनर्गठन आणि विस्तारित योजना, यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्तीवेतनासंदर्भात आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं, तसंच जुनी निवृत्ती वेतन योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं, चौधरी यांनी सांगितलं. याला पर्याय म्हणून २०१९ मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे, यामध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शनसह वृद्धावस्थेत सुरक्षेचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत सव्वा दोन कोटींहून अधिक कारागिरांची नावनोंदणी करण्यात आली असून, यापैकी सुमारे १४ लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहितीही चौधरी यांनी दिली.

****

राज्यसभेचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य काळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्यापारी आणि खासगी बँका सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत असून, त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या बँकांवर कारवाई होणार नसेल, तर सरकारची आणि बँकांची मिलीभगत असल्याची शंका येते, असा आरोपही त्यांनी केला.

****

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे, विरोधी पक्षांनी आपली भूमिकाही त्यावेळी स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आता सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, असं पटोले यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येत्या ३० जुलै रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं येणार आहेत. उदगीर शहरात तळीवेस भागातल्या भव्य अशा बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राज्याचे क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रपती उदयगिरी महाविद्यालयात एका कार्यक्रमाला संबोधित करतील. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

****


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर १९६६ मध्ये ही बंदी लागू केली होती. ती मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

****

२०२४-२५ या वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणास मदत मिळणार आहे.

****

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल घेण्यात आला. या समितीनं लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्रीनं दिले आहेत.

****

राज्यभरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह स्थानिक यंत्रणांनी सतर्क राहावं, आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. हवामान खात्याकडून तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी, आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावं, पर्यायी निवारास्थानं, जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी केल्या आहेत.

****

राज्यात काल बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात काल सरासरी एकोणीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६१ पूर्णांक ८० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

****

महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने काल अहमदनगर शहरात ऑलिम्पिक दौंड काढण्यात आली. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक खेळाडू या दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

****

जालना जिल्ह्यात काल संपूर्णता अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. बदनापूर पंचायत समिती आणि वाकुळणी ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना, जमिनींच्या आरोग्य का‍‌र्डांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमस्थळी, पोषण आहाराविषयीचं प्रदर्शन लावण्यात आले होतं, तसंच पोषण आणि स्वच्छता विषयावर वत्कृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांची संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. संघटनेत राहून वेगळे निर्णय घेणं तसंच बैठकांना गैरहजर राहणं, यासाठी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान तुपकर यांनी, यावर प्रतिक्रिया देतांना, उद्या २४ जुलै रोजी पुण्यात कार्यकर्त्यांना सोबत घेवून पुढील वाटचाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.

****

नव्या भारताचे नवीन कायदे, या विषयावर धाराशिव इथं आजपासून दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवीन पोलीस अधिक्षक कार्यालयात होणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणीसह विविध विषयांवर माहिती मांडण्यात येणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाला काल आठ दिवस पूर्ण झाले. या संपात जिल्ह्यातले ४३७ कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनानं आपल्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...