Wednesday, 24 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्यायासह बदलत्या काळानुरुप सुधारणेला प्राधान्य 

·      पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये

·      महाराष्ट्रासाठी सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद, तर-राज्याला सापत्न वागणूक दिल्याची विरोधी पक्षांची टीका

·      आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान तसंच अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आणि

·      महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा पराभव करत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

सविस्तर बातम्या

आयकर दात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास, आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा, चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि बदलत्या काळानुरुप सुधारणा या नऊ प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.

या अर्थसंकल्पात, पगारदारांसाठी स्टॅंडर्ड डिडक्शन- मानक वजावटीची मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे.

वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून, तीन लाखापासून सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात लाख ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के, १२ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने करमूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत.

या बदलांमुळे पगारदारांच्या आयकरात साडे सतरा हजार रुपये बचत होणार असून, चार कोटीहून अधिक पगारदारांना याचा लाभ होणार आहे.

****

या अर्थसंकल्पात, कर्करोगावरची तीन औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं असून, मोबाईल फोन तसंच इलेक्ट्रीक वाहनांचे सुटे भाग, चामड्याच्या वस्तूं, अणु उर्जेसाठी लागणारी उपकरणं, यासह प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर २५ धातूंवरच्या सीमा शुल्कात कपात तर प्लास्टिक, फ्लेक्स आदीच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

****

पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून, शहरी भागात गरीबांच्या घरांसाठी दहा लाख कोटी रुपये, तर महिला आणि बालिका विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पाच योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना एक महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा १ लाख रुपये मासिक वेतन असून, योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

युवकांसाठी इंटर्नशीप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली, यामध्ये पुढच्या पाच वर्षात पाचशे कंपन्यामध्ये युवकांना १२ महिने इंटर्नशीपचा अनुभव मिळणार आहे, यासाठी दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सहा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एक कोटी शेतकऱ्यांनां नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून, अधिक उत्पादन देणारी ३२ विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी शंभरावर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक लाख ५२ हजार कोटी रुपये, ग्रामविकास दोन लाख ६६ हजार कोटी रुपये, तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली, या माध्यमातून ६३ हजार गावांतल्या पाच कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे.

****

हा अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, आणि या गतीत सातत्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग तसंच वाणिज्य क्षेत्रात कार्यरत भारतीय उद्योग महासंघ-सीआयआय, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ- फिक्की, असोचॅम, आदी संस्थांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अर्थसंकल्प, 'विकसित भारत' संकल्पनेला बळ देणारा असल्याचं तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं.

****

विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारने तुरी दिल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, महाराष्ट्राला सापत्न वागणुक देत, केंद्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यामुळेच बिहार आणि आंध्रप्रदेशाला भरभरून निधी वाटप केल्याचा आरोप केला.

****

दरम्यान, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्राथमिक आढाव्यानुसार, यामध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांसाठी ६०० कोटी, ग्रामीण रस्ते सुधार ४०० कोटी, कृषी प्रकल्पांसाठी ५९८ कोटी, उद्योग ४६६ कोटी, आदी तरतुदींचा समावेश असून, राज्यासाठी यापेक्षा अधिक तरतुदी असतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

****

या अर्थसंकल्पाचं छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल नंदकिशोर मालपाणी यांनी केलेलं विश्लेषण, आज सकाळी पावणे अकरा वाजता, आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या सदरात ऐकता येणार आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रतेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यासंदर्भात दाखल अनेक याचिकांवर काल झालेल्या सुनावणीनंतर, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय देतांना, पेपरफुटीचा तसंच परीक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. फेरपरीक्षा घेतल्यास, २३ लाखाहून अधिक परीक्षार्थी तसंच शैक्षणिक कार्यक्रम प्रभावित होण्याची शक्यता न्यायालयानं व्यक्त केली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत मुलाखतीकरता पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे आणि नागपूर इथं होणार आहे. उमेदवारांना दिनांक आणि ठिकाण स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार आहे.

****

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसंच गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांना ३० जून २०१६ पासून पदोन्नतीत आरक्षण, शेती पिकांचं नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणं, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना यापुढेही सुरू ठेवणं, आदी निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले. राज्यातलं पर्जन्यमान आणि सर्व धरणात उपलब्ध पाणीसाठा, याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला.

****

महसूल खात्याच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या संप काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांना संप थांबवण्याचं आवाहन करून, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हा संप मागे घेतल्याचं महसूल संघटनांनी जाहीर केलं.

****

महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल नेपाळचा ८२ धावांनी पराभव करत भारताने उपान्त्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. काल श्रीलंकेतल्या दांबुला इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी तीन बाद १७८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला नेपाळचा संघ २० षटकात ९६ धावाच करु शकला. या विजयासह भारतीय संघानं उपांत्यफेरी गाठली आहे.  

****

हिंगोली जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला राज्यात पहिला 'राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार' जाहीर झाला आहे. बालरोग विभाग प्रमुख डॉ. गोपाळ कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला असून, येत्या स्वातंत्र्य दिनी या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन मोहिमेअंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत काल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाहाविषयी माहिती देण्यासाठी दहा-नऊ-आठ या चाईल्ड मदतवाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

****


सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाला काल प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत दोन दिवस चालणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड आणि पालम इथं अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना काल ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचं प्रशिक्षण देण्यात आलं. पालम इथं आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. राखी पौर्णिमेपर्यंत तालुक्यातल्या किमान ५० टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचं आवाहन गुट्टे यांनी केलं.

****

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशासकीय यंत्रणांनी मनुष्यबळाची मागणी त्वरित नोंदवावी, असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...