Saturday, 24 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 August 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

नेपाळमधल्या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूत पोहचल्या आहेत. त्यांनी भारतीय राजदूत आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिवांशी बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी टीयू रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

काल पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटकांची बस मर्शियंदी नदीत पडल्याने २७ भारतीयांचा मृत्यू झाला होता. जखमी सोळा प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावास जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर परत आणण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. 

****

जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १८ सप्टेंबर रोजी सात जिल्ह्यांत २४ जागंसाठी मतदान होणार आहे. यात अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि जम्‍मू प्रभागात डोडा, रामबन तसंच किस्‍तवाड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ५ लाख ६६ हजार युवा मतदारांसह २३ लाख २७ हजारांहून अधिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगढच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रायपूर इथं पोहोचले. ते आज नक्षल विरोधी अभियानाशी संबंधित अनेक बैठकांमध्ये अध्यक्षस्थानी असतील. आंतरराज्यीय समन्वयासंदर्भात छत्तीसगढ आणि शेजारच्या राज्यांचे मुख्य सचिव तसंच पोलिस महानिदेशकांशी ते संवाद साधणार आहेत. 

छत्तीसगढमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्ष  सत्तेत आल्यानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत १४२ नक्षलवादी मारले गेले आहेत.

****

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत,  आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक  सहभागी होते.

पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. गोंदिया शहरातही महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून  निषेध आंदोलन करण्यात आलं.

****

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण - एफएसएसएआईने राज्यांना  कीटनाशकांचा कमीत कमी वापर करण्यास तसंच शेतकरी स्तरावर कीटनाशकांची निगराणी आणि विनियमनाकरिता अंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यास सांगितलं  आहे. या संदर्भातल्या केंद्रीय सल्लागार समितीच्या चव्वेचाळीसाव्या बैठकीत बोलताना प्राधिकरणचे मुख्य अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी शेती करण्याची पद्धत सुरक्षित आणि टिकाऊ राहावी हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं. 

कीटकनाशकं वापरुन तयार झालेली उत्पादनं आहारात समाविष्ट झाल्यामुळं होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा निपटारा होण्यातही यामुळे मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्राय ने काल पीएम वाणी योजनेसाठी  दूरसंचार शुल्‍क आदेशाचा प्रारूप आराखडा जारी केला आहे. ही योजना देशाच्या ग्रामीण आणि तळागाळातल्या नागरिकांना वेगवान  इंटरनेट सेवा उपलब्‍ध करुन देण्याच्या उद्देशानं २०२० मध्ये सुरु करण्यात आली आहे. या संशोधित आदेशाचा प्रारूप आराखडा ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या संदर्भात संबंधितांना आपल्या प्रतिक्रिया सहा सप्टेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत.

****

जवळपास पंधरा दिवसांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. काल दिवसभर अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या.  मध्यरात्रीपासून मात्र जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. आज  सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये लांज्यात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर राजापुरात सर्वात कमी ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...