Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
यवतमाळ इथं आज महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गंत मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या
या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभाचं वितरण करण्यात येणार आहे.
****
बदलापूर इथं पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध
करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पुण्यात
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरु आहे, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, तर मुंबईत शिवसेना भवन इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षातर्फे निेषेध आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे.
****
देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि
कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या
मार्गदर्शक तत्त्वांनुसार,
शाळा आणि इतर शैक्षणिक
संस्थांमध्ये मंत्रालयानं 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत
मार्गदर्शक सूचना' तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक
सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, अहवाल देण्याची प्रक्रिया आणि सहाय्यक तरतुदी नमूद आहेत.
****
मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर इथं येत्या तीन
आणि चार सप्टेंबर रोजी आयोजित सत्तावीसाव्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४ चं
उद्घघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेचं यजमानपद यंदा
महाराष्ट्राकडे आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवणे" हा
या परिषदेचा विषय आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह या परिषदेचे
अध्यक्ष असतील.
या परिषदेतून सु-प्रशासन आणि ई- गव्हर्नन्ससाठीच्या
उत्कृष्ट संकल्पनांचं आदान-प्रदान होणार आहे.
****
नांदेडमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळं शहरातल्या अनेक सखल भागात तसंच काही घरांमध्ये
पाणी शिरलं. दरम्यान,
नांदेड इथंच कालपासून
आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा
यांची बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथा सुरू झाली आहे. या कथेसाठी टाकण्यात आलेल्या
सभामंडपात पावसाचं पाणी शिरल्यानं मुक्कामी असलेल्या हजारो भाविकांची मोठी गैरसोय झाली.
त्यामुळं ही कथा भाविकांसाठी दोन दिवस ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती
संभाजीनगर शहरातही काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला.
****
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून
पाऊस सुरु आहे, काल सायंकाळपासून मात्र, संततधार पाऊस सुरु झाला असून रात्री दहानंतर जोरदार
पाऊस झाला, तर आज पहाटेपासूनही जोरदार पाऊस सुरू
आहे.
दरम्यान, अहमदनगर
जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील नद्या प्रवाहित
झाल्या आहेत. यामुळं शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
****
जॉर्डनच्या अम्मान इथं सुरु असलेल्या सतरा वर्षाखालील
विश्व कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत भारतीय महिलांनी १८५ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं आहे.
भारताची काजल, सुवर्णपदक मिळवणारी पाचवी महिला पहिलवान
ठरली आहे. तिने एकोणसत्तर किलो वजनी गटात युक्रेनच्या एलेक्ज़ेंड्रा रयबक हिला ९-२
अशा फरकानं हरवत हा विजय मिळवला. श्रुतिका पाटीलनं ४६ किलोग्राम वजन गटात रौप्य तर
राज बाला आणि मुस्कान हिनं अनुक्रमे ४० आणि ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.
****
क्रिकेटपटू शिखर धवननं निवृत्ती जाहीर केली आहे. आज
सकाळी ट्विटरवर जारी केलेल्या एका ध्वनिचित्रफितीतून त्यानं, आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून
निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. आपल्या सुमारे १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत
शिखरनं कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी या तीन प्रकारात
मिळून २६९ सामने खेळले,
त्यात त्यानं एकूण २४
शतकं आणि ५५ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याला अर्जुन पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी
सन्मानित करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment