Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा
इशारा
·
राष्ट्रीय जल पुरस्कार
जाहीर-राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक
·
धाराशिव जिल्हा बँकेला ७४
कोटी रुपये भागभांडवल देण्याचा राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय;बँकेचं
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीसही मान्यता
·
हिंगोली जिल्ह्यात
जलप्रकल्पांसाठी २१४ कोटी रुपये मंजूर
आणि
·
विविध महापालिकांची प्रभाग
आरक्षण सोडत जाहीर
****
दिल्ली कार स्फोटाच्या कटात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर
कारवाईचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भूतानचे चौथे राजे जिग्मे
सिंग्ये वांगचुक यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त राजधानी थिंफू इथं झालेल्या विशेष
कार्यक्रमात ते आज बोलत होते. दिल्लीत झालेल्या या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत
पंतप्रधानांनी,
आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन
गुन्हेगारांना शोधून काढतील, असं सांगितलं.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान
मोदी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे
विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग चू जलविद्युत
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला
इथून दूरध्वनीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद केला. काल दिल्लीत
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबाबत राष्ट्रपतींनी अमित शहा यांच्याकडून विस्तृत
माहिती घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए
कडे सोपवण्यात आला आहे.
****
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत
शिक्षा होणारच,
अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली. ते आज नवी
दिल्लीत एका बैठकीत बोलत होते. तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून, त्या
तपासाचे निष्कर्ष लवकरच खुले केले जातील, असं त्यांनी सांगितलं. ते
म्हणाले –
बाईट - संरक्षणमंत्री राजनाथसिंह
दरम्यान, दिल्ली कार स्फोट प्रकरणातल्या एका
संशयिताच्या वडिलांना जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा इथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात
आलं आहे. तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लाल किल्ला १३ नोव्हेंबरपर्यंत
बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
****
सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
विविध दहा श्रेणींसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांत राज्य श्रेणीमध्ये
महाराष्ट्राला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.जल शक्ति मंत्री सी.आर.पाटील यांनी ही
माहिती दिली आहे. गुजरात राज्याला दुसरा तर हरियाणा राज्याला तिसरा क्रमांक मिळाला
आहे. येत्या अठरा तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार
प्रदान केले जाणार आहेत.
****
नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा
बँकांना ८२७ कोटी रुपये भागभांडवल देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याच्या
हेतुने हा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यात
नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव
जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती
सातत्याने खालावत असल्याने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त
करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात
आली.
राज्यातील न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीश
निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आठ हजार २८२
सुरक्षारक्षक नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या
सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक तरतुदीसही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा
कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या
आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी आता ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार
आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्प आणि
त्यासाठीच्या ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या
प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातील डिग्रस, लोहगाव आणि दाटेगांव या
गावातील ६०३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव
तालुक्यातल्या सुकळी साठवण प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांची तरतुद करण्यासही
मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत राज्य कृषी
विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच 'शाश्वत शेती - समृद्ध
शेतकरी' या नवीन घोषवाक्याचं अनावरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेचे
विजेते भुसावळचे वीरेंद्र पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्या परभणीच्या
सिद्धी देसाई,
यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत
काढण्यात आली. महापालिकेतल्या ११५ नगरसेवकांपैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव तर इतर
मागास प्रवर्गासाठी ३१,
अनुसूचित जातीसाठी २२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २
जागा आरक्षित झाल्याची घोषणा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली –
बाईट - मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
नांदेड महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार, एकूण
८१ नगरसेवकापैकी ४१ महिला नगरसेवक राहतील. अनुसूचित जातीच्या १५ जागा, अनुसूचित
जमातीच्या दोन,
नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या २१ आणि खुल्या प्रवर्गातल्या
४३ जागांचं आरक्षण आज महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या
उपस्थितीत जाहीर झालं.
****
जालना महानगरपालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज
जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा महापालिका
आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली १६ प्रभागातल्या एकूण ६५ नगरसेवक
पदांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात
आलं.
आगामी निवडणूक काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित
ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून, अकरा जणांना जालना
जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने
ही कारवाई करण्यात आली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी
अभ्यासक्रमाची परीक्षा आजपासून सुरू झाली. यासाठी विद्यापीठाने ३३ भरारी पथकांची
नियुक्त केली आहे. तीन लाख ५५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी
परीक्षाही आजपासून सुरू झाल्या आहेत. नांदेड, लातूर, परभणी
आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत एकूण १२४ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होत आहेत.
सुमारे एक लाख वीस हजार विद्यार्थी विविध शाखांच्या परीक्षेत सहभागी झाले आहेत.
****
बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षक आणि परिवेक्षीय
यंत्रणेची तालुकास्तरीय ‘विनोबा भावे ॲप’ कार्यशाळा आज बीड इथे पार पडली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ॲपचा प्रभावी वापर करावा, अशी
सूचना बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केली.
****
इजिप्तमध्ये कैरो इथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी
अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा यानं
काल सुवर्णपदक जिंकलं. एअर पिस्तुल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो
पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या पदकांसह भारताची पदकसंख्या ९ झाली असून त्यात
तीन सुवर्ण,
तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
****
दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. भारत आणि श्रीलंका
यांच्याकडे संयुक्तपणे या स्पर्धेचं यजमानपद असून, या स्पर्धेचा पहिला
सामना भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये होणार आहे. अंतिम सामना श्रीलंकेत कोलंबो
इथे होणार आहे.
****
No comments:
Post a Comment