Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू
आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात
मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल
मलिक याला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलगाम पोलिसांनी २०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले, तसंच
कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात
आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह
विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये उभी होती, असं चौकशीदरम्यान समोर आलं आहे.
तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, या कार स्फोटाचं सीसीटीव्ही
फुटेज समोर आलं आहे. या स्फोटात वापरण्यात आलेली कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी
करण्यात आली होती,
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोत्सवानाच्या
दौऱ्यावर असून, आज
त्या गॅबरोन इथं बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा बोको यांच्याशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय
बैठक घेणार आहेत. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, आरोग्य, औषधनिर्माण, संरक्षण
आणि नागरिकांमधील संबंध बळकट करण्यावर चर्चा होणार आहे. तसंच अनेक महत्त्वपूर्ण करारांवर
स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती बोत्सवानातील संसद सदस्यांना संबोधित
करतील, भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देतील.
****
भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान
नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी आज भूतान नरेश जीग्मे खेसर नामग्येल
वांगचूक यांच्यासह थिंपू इथं आयोजित कालचक्र सशक्तीकरण समारंभात सहभाग घेतला. हा समारंभ
तिबेटी बौद्ध धर्मातला एक पवित्र विधी असून, ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान
आणि आत्मशांती मिळवण्याचं प्रतीक मानलं जातं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी
काल भूतान नरेश यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चाही केली. या बैठकीत अक्षय ऊर्जा, आरोग्य
देखभाल, औषधनिर्माण आणि मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक सहकार्य याबाबत तीन महत्त्वपूर्ण
सामंजस्य करार करण्यात आले.
****
जागतिक न्यूमोनिया दिन आज पाळण्यात येत आहे.
यानिमित्त जारी केलेल्या संदेशात केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी बालकांचं
न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. सरकारने
मजबूत आरोग्य व्यवस्था आणि सामुदायिक जागरूकरेद्वारे न्यूमोनिया कमी करण्यासाठी उपक्रम
सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘न्यूमोनिया नही, तो बचपन सही’ हा संदेश
या आजाराचा प्रतिबंध आणि वेळेवर काळजी घेण्यासाठी
सामूहिक कृतीला प्रेरणा देत असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.
****
सुधारित भारत नेट योजना लागू करणारं पंजाब
हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे. यामुळे देशात कुठूनही या सीमावर्ती राज्याचं थेट
निरीक्षण करता येईल. बीएसएनएल पंजाब सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार करारा यांनी
योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्य सचिव के.ए.पी. सिन्हा यांचा सन्मान केला. राज्यातल्या
४३ भागात इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नोव्हेंबर
अखेरपर्यंत प्रत्येक गाव या योजनेत समाविष्ट केलं जाईल, असं
मुख्य सचिवांनी सांगितलं. भारत नेट योजनेचं उद्दिष्ट देशातल्या सर्व ग्रामपंचायतींना
तसंच घरांना आणि संस्थांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणं हे आहे. त्यात ग्रामीण
भागात ई-आरोग्य आणि ई-गव्हर्नन्स सेवांचा देखील समावेश आहे.
****
लोक सेवा प्रसारण दिवस आज साजरा होत आहे.
१२ नोव्हेंबर १९४७ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरुन केलेल्या
ऐतिहासिक संबोधनाचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
****
धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी
देण्यासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला आहे. याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे
आभार मानले. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी
आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी
पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने बँकेला अर्थसहाय्य देण्याचा
निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे
मृत्यूमुखी पडणाऱ्या किंवा
अपघातग्रस्त होणाऱ्या नागरिकांना किंवा कुटुंबियांना नुकसानभरपाई
देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात
आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत लातूर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांचाही समावेश आहे. अशा रस्त्यांबाबत नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करता येईल, असं
प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत
नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. बीड पालिकेत एकही
अर्ज दाखल झाला नसल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment