Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या
मतमोजणीतल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमताचा टप्पा ओलांडल्याचं दिसून
येत आहे. विधानसभेच्या २४३ पैकी जवळपास १९५ जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आघाडीवर
आहे, तर महाआघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षानं ८९, संयुक्त जनता
दलानं ७९, लोकजनशक्ती पार्टी रामविलास २१ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय जनता दल ३३ तर काँग्रेसनं
आतापर्यंत चार जागांवर आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, सात राज्यांमधल्या
आठ विधानसभा मतदरासंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. यामध्ये जम्मू
काश्मीरमधल्या बडगाम आणि नगरोटा, राजस्थानमधल्या अंता, झारखंड मधल्या घाटशिला, तेलंगणा मधल्या
जुबली हिल्स, पंजाब मधल्या तरनतारन, मिझोराम मधल्या डम्पा आणि ओडिशामधल्या नुआपाडा या मतदारसंघांचा
समावेश आहे. डम्पा मतदारसंघातून मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार विजयी झाले.
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
बालदिनही आज साजरा होत असून, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून नेहरुंचं स्मरण केलं. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात बालदिनानिमित्त विविध शाळा आणि संघटनांच्या विद्यार्थ्यांसोबत
संवाद साधणार आहेत.
****
साहित्य अकादमीचे बाल साहित्यासाठीचे
पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या
एक बटे बारा या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळमाया
या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.
****
'महाराष्ट्र भूषण २०२४' हा पुरस्कार
आज ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सुतार यांना
नोएडा इथं त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.
****
जागतिक मधुमेह दिवस आज पाळण्यात
येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदा मधुमेह दिनासाठी “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
मधुमेह” हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाने मधुमेहाच्या
वाढत्या आकडेवारीला तोंड देण्यासाठी तातडीने आणि समन्वित उपाययोजना राबवण्याचं आवाहन
केलं आहे. मधुमेहग्रस्त मुलांना घर आणि शाळेत योग्य वेळी विशेष सहाय्य मिळणं आवश्यक
असल्याचंही संघटनेनं यानिमित्त नमूद केलं.
****
क्रांतीसूर्य भगवान बिरसा
मुंडा यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर इथं उद्यापासून १७ नोव्हेंबर पर्यंत भव्य
जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्यपातळीवरच्या महोत्सवाचं उद्घाटन
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके
यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. याचबरोबर राज्यातल्या सुमारे चार हजार ९७५ आदिवासी
गावांमध्ये शासनाच्या सर्व विभागामार्फत समग्र विकासासाठी एक व्यापक मोहीम राबवली जात
असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी
महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या
कारवाईत चार प्रवाशांकडून सुमारे १९ किलो अंमली पदार्थ जप्त केले. हे प्रवासी बँकॉकहून
मुंबईत आले होते. या अंमली पदार्थांचं बाजार मूल्य जवळपास १८ कोटी रुपये इतकं आहे.
त्याचबरोबर सीमा शुल्क विभागाने मुंबईहून दुबईला जाणार्या एका प्रवाशाकडून परकीय चलन
जप्त केलं, ज्याची किंमत सुमारे साडे तेरा लाख रुपये इतकी आहे. तर मस्कत आणि दुबईहून आलेल्या
तीन प्रवाशांकडून जवळपास एक कोटी १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे बार आणि चार पाऊच जप्त
करण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांना अटक करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राज्यात १७ नोव्हेंबर ते २
डिसेंबर या कालावधीत विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत हिंगोली
जिल्ह्यात एक हजार १३५ चमूमार्फत ११ लाख २३ हजार ८३६ लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात
येणार आहे.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येत असलेल्या एकता अभियानाअंतर्गत आज
सांगली इथं एकता पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा
दाखवून या यात्रेला सुरुवात केली. विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येनं यात सहभागी
झाले होते.
****
ढाका इथं सुरु असलेल्या आशियाई
तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज सुवर्ण पदकाची कमाई केली. पुरुषांच्या रिकर्व्ह
प्रकारात यशदीप भोगे, अतनु दास आणि राहुल यांच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण
कोरियाला हरवून सुवर्णपदक पटकावलं. महिला एकेरीत दीपिका कुमारी आणि संगीता, तर पुरुष एकेरीत
धीरज बोम्मदेवरा आणि राहुल आज उपांत्य फेरीत खेळणार आहेत.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान
दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलकाता इथं आजपासून सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा
निर्णय घेणार्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
त्यांच्या पाच बाद १२९ धावा झाल्या होत्या. जसप्रित बुमराहनं तीन तर कुलदीप यादवने
दोन गडी बाद केले.
****
No comments:
Post a Comment